मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत, तर सुमारे १०० घरांचे नुकसान झाले असून पुरामुळे शेकडो लोक बेघर झाल्याची माहिती राज्य आपत्तकालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

 राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. गेल्या २४  तासात रायगड जिल्ह्यात २३६ मिलीमीटर, ठाणे जिह्यात १६१, रत्नागिरी १५२ तर पालघर जिह्यात सरासरी १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या ४८ तासात लोणावळा येथे तब्बल ६२५ मिलीमीटर म्हणजेच २४.७१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबईत १०० ते १६१ मिलिमीटर दरम्यान पाऊस पडला आहे.

उल्हास, काळू,पिंजाळ या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर अंबा, सावित्री, कुंडलिका, पातळगंगा, जगबुडी, उल्हास या नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने बदलापूर,  मोहणे, जांबूळपाडा या परिसराला पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईतील मानखूर्द भागात झोपडपट्टीवर इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. तर उपनगरात झाड पडून एकाचा मृत्यू झाला. ठाण्यात इमारतीचा भाग कोसळून दोन जण जखमी, पालघरमध्ये पाण्यात पोहताना बुडून एकाचा मृत्यू झाला असून सातारा जि्हयातही दरड कोसळून एकाचा मृत्यू तर ४ जण जखमी झाल्याची घटना घडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्यात बूडून एकाचा मृत्यू झाला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ३०घरांची पडझड झाली आहे.

माथेरान, लोणावळा, खोपोली, लोहोगड पावसाची तीव्रता जास्त असल्याने भूस्खलनाबाबत धोका निर्माण झाला असून या भागासाठी रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिसरात  एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यात पाटण येथे घरावर दरड कोळल्याने चार नागरिक दबल्याची घटना घडली होती. तर तळेगाव- दाभाडे येथे २५  प्रवाशांना घेऊन चाललेली बस पुरात अडकली होती. एनडीआरएफच्या पथकाने या सर्वांना सुरिक्षतपणे बाहेर काढले. 

मुंबई- गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अशाचप्रकारे मुंबई- पुणे महामार्गावरही दरड  कोसळल्याने आणि खोपोली  महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र दुपारनंतर वाहतूक सुरू करण्यात प्रशासनास यश आले. मावळ आणि ताम्हीणी घाट सुद्ध दरडी कोसळल्याने तसेच पुरामुळे प्रभावीत झाला असून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

रायगड जिल्हयात सुधागड तालुक्यात  पुरामुळे सहा महिन्याच्या बाळासह एकाच कुटुंबातील सहाजण घराच्या छतावर अडकले होते. या गावात जाणारे रस्ते बंद असल्याने बोटीद्वारे सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली.

विदर्भात अजूूनही पावसाची प्रतिक्षा

राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी होत असताना विदर्भातील वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्हयात अजूनही पाऊस झालेला नाही.