मुंबई : राज्य सरकारी – निम सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.यामध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयांतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे रुग्णसेवेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारची रुग्णालये सेवा पुरविण्यासाठी सज्ज झाली आहेत.
सर्व सरकारी रुग्णालयातील सफाई कामगार, कक्ष सेवक आणि परिचारिका सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांतील आरोग्य सेवा पूर्णत: ठप्प होऊन त्याचा फटका रुग्णांना बसणार आहे. आंतररुग्ण विभाग आणि काही महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकांच्या जागेवर शिकाऊ परिचारिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी संपाचा आढावा घेऊन अतिरिक्त कर्मचारी बाहेरून मागविण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. रुग्णालयातील सफाई कामगार, कक्ष सेवक, पाणी व्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी काही कर्मचारी बाहेरून मागविण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.