संक्रमण सदनिका घोषित करण्यास मंजुरी?

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सदनिकांच्या विक्रीसाठी गेल्या नऊ वर्षांत जारी करण्यात आलेल्या सोडतीतील सुमारे १८०० सदनिका रिक्त असल्याची बाब उघड झाली आहे.

पावसाळ्याच्या पाश्र्वाभूमीवर अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी या सदनिकांचा संक्रमण सदनिका म्हणून वापर करण्यास म्हाडा उपाध्यक्षांनी मान्यता दिल्याचे इमारत व दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. तसे झाल्यास मुंबईकरांना म्हाडाच्या परवडणाऱ्या १८०० घरांना मुकावे लागणार आहे तर संक्रमण सदनिका म्हणून बरी घरे दक्षिण व मध्य मुंबईतील मोडकळीस आलेल्या रहिवाशांना मिळणार आहेत.

२०११ ते २०१९ या नऊ वर्षांत सोडतीत यशस्वी झालेल्या परंतु आपली पात्रता सिद्ध करू न शकलेल्या विजेत्यांची घरे अद्याप रिक्त आहेत. ही घरे नियमानुसार प्रतीक्षा यादीवरील उमेदवाराला देणे बंधनकारक आहे. परंतु तेही होऊ शकलेले नाही वा तेही पात्रता सिद्ध करू शकलेले नाहीत. मुंबई गृहनिर्माण मंडळाने अशा रिक्त घरांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार १८२६ घरे सोडतीनंतरही रिक्त राहिली आहेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाला नव्याने सोडत काढावी लागणार आहे. परंतु त्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घरांची सोडत न काढता त्याचा संक्रमण सदनिका म्हणून वापर करण्यास परवानगी द्या, अशी मागणी घोसाळकर यांनी म्हाडा उपाध्यक्षांकडे केली. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनीही त्यास हिरवा कंदील दाखवून तसा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. मात्र घरांचा संक्रमण सदनिका म्हणून वापर करण्यास कायदेशीर अडचण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोडतीत यशस्वी झालेला उमेदवार कागदपत्रे वा तत्सम बाबींची पूर्तता करू न शकल्यास ती घरे प्रतीक्षा यादीवरील उमेदवाराला देणे बंधनकारक आहे. प्रतीक्षा यादीवरील उमेदवारही यशस्वी न ठरल्यास या घरांसाठी पुन्हा सोडत काढणे आवश्यक आहे, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

नऊ वर्षांत म्हाडाने सोडतीत दहा हजार ९९८ घरे उपलब्ध करून दिली. त्यापैकी नऊ हजार १७२ घरांचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. १८२६ घरांचे वितरण होऊ शकले नाही. त्यामध्ये निवासयोग्य प्रमाणपत्र न मिळालेल्या ३७७ घरांचा समावेश आहे. यापैकी ६२३ घरे करोना काळात विलगीकरण केंद्रांसाठी देण्यात आली होती. आतापर्यंत प्रतीक्षा यादीवरील फक्त ६७ जणांनी कागदपत्रे सादर केली आहेत. पात्र होऊनही १२६ जण संपूर्ण पैसे भरू शकलेले नाहीत. १३८ जणांनी २५ टक्के तर १७६ जणांनी २५ ते १०० टक्क्यांदरम्यान पैसे भरले आहेत. निवासयोग्य प्रमाणपत्र न मिळालेली ३७७ घरे ही कोपरी, तुंगा-पवई, सिद्धार्थ नगर, पत्राचाळ- गोरेगाव या परिसरात आहेत.