मुंबई : पुढील दहा वर्षांत गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल दहा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्मिती ही उत्तम संधी असून २०५० पर्यंत त्यात ३६ अब्ज अमेरिकन डॉलर्सची ऊलाढाल अपेक्षित आहे, असे क्रेडाईचे अध्यक्ष व रुस्तमजी समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बोमन इरानी यांनी स्पष्ट केले.
कॅान्फर्डेशन ॲाफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनच्या (क्रेडाई) महाराष्ट्र विभागातर्फे आयोजित‘महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन’ (महाकॉन) या तीन दिवसांच्या परिषदेचा समारोप झाला. या परिषदेची सुरुवात इरानी यांच्या मुख्य भाषणाने झाली. भारतीय गृहनिर्माण बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. आपण या क्षेत्रात प्रचंड बदल पाहिले आहेत. आपण एका उत्तम संधीच्या उंबरठ्यावर उभे असून गेल्या दशकात या उद्योगाने जवळजवळ १३० टक्के वाढ अनुभवली आहे. हा वेग पाहता पुढील दहा वर्षांत हे क्षेत्र दहा लाख कोटी रुपयांचे बनण्याच्या मार्गावर आहे. २०५० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक गृहनिर्माण ३६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशात दर्जेदार व्यावसायिक गृहनिर्माणाची कमतरता आहे. या क्षेत्रात प्रचंड क्षमता असून २०३५ पर्यंत एकूण बाजारपेठ १.४३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असेही इरानी यांनी स्पष्ट केले.
आयआयटी आणि गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्या नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात अधिक प्रभावीपणे योगदान देण्यासाठी एकत्र काम करू शकतात. या क्षेत्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी सतत शिक्षण, कौशल्याची देवाणघेवाण आणि नूतनीकरण आवश्यक असल्याचे मतही इरानी यांनी व्यक्त केले. भविष्यात भारतीय गृहनिर्माणमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती महाजालाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
या चर्चासत्रात क्रेडाईचे माजी अध्यक्ष सतीश मगर म्हणाले की, जग वेगाने बदलत आहे आणि महाराष्ट्रही बदलत आहे. नवीन पायाभूत सुविधा, कॉरिडॉर आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प राज्याच्या आर्थिक आणि शहरीकरणाला आकार देत आहेत. सुधारित वाहतूक नेटवर्क आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमुळे शहरांमधील अंतर कमी झाले आहे. ज्यामुळे पारंपारिक शहरी केंद्रांच्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणूक, विकास आणि रोजगाराच्या संधींचे नवीन दरवाजे उघडले आहेत.
गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एआय’चलित विक्री, ब्रँडिंग आणि मार्केटिंग धोरणाबाबत श्रेया बजाज-शाह यांनी तर दिलीप कोटीभास्कर यांनी दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील पुनर्विकासाच्या उपलब्ध संधीबाबत सादरीकरण केले. मनीष भतिजा यांनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये थीम-आधारित नियोजन तर सतीश मराठे यांनी राष्ट्र उभारणीत गृहनिर्माण क्षेत्राची भूमिका याबाबत विवेचन केले. सार्थक आहुजा यांनी भागधारकांसाठी नियामक, आर्थिक आणि इतर पैलूंबाबत माहिती दिली. वास्तुविशारद अभय भोसले यांनी पुनर्विकास प्रकल्पातील संकल्पना आणि विक्री प्रस्तावांबाबत माहिती दिली.
