मुंबई : राज्य मंडळाने कोकण विभाग स्वतंत्र केल्यापासून दरवर्षी बारावीच्या निकालात कोकण विभाग हा अव्वल ठरतो. त्यामुळे काेकणातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली जाते. तसेच कोकणातील पोरं हुशार अशी चर्चाही होते. मात्र यामागील नेमके कारण हे कोकण विभागातील विद्यार्थ्यांची संख्या असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अन्य मंडळाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण विभागाने यंदाही ९४.१४ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण ठेवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. कोकण विभाग दरवर्षी अव्वल क्रमांक पटकावत असला तरी तेथे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही अन्य विभागांच्या तुलनेत फारच कमी असते. राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे व नागपूर विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंद होते. यंदा मुंबई विभागातून ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

त्याखालोखाल पुण्यातून २ लाख ४१ हजार ८२६ आणि नागपूर विभागातून १ लाख ५२ हजार २३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर (१ लाख ८४ हजार ८४१), नाशिक (१ लाख ६२ हजार ९१४), अमरावती (१ लाख ४८ हजार ९३१), कोल्हापूर (१ लाख ११ हजार ४८२) आणि लातूरमध्ये ९१ हजार ३२६ विद्यार्थी परीक्षेला बसतात. मात्र कोकण विभागातून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या सर्व विभागांच्या तुलनेत फारच कमी आहे. कोकण विभागातून यंदा बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ हजार ८८८ इतकी आहे. हे प्रमाण अन्य विभागांच्या तुलनेत फारच कमी आहे.

मुंबई, पुण्यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांइतके कोकणातील विद्यार्थी कोकण विभगातून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २० ते २५ हजारांच्या घरामध्ये असते. त्यामुळे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या विभागांच्या तुलनेत फारच कमी असते. मुंबई विभागातून यंदा परीक्षेला बसलेल्या ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुणे विभागातून बसलेल्या २ लाख ४१ हजार ८२६ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार १४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मुंबई, पुणे विभागातून अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांइतके विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला बसतात. तसेच काेकण विभागातून यंदा १ हजार ३४० इतके विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सरासरीमध्ये कोकण नेहमीच अव्वल ठरत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण विभागातून विद्यार्थी संख्या कमी तसेच महाविद्यालयांची संख्याही अल्प आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून परीक्षेची तयारी करून घेणे शक्य होते. परिणामी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक असते.