मुंबईः उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे देश आणि जगभरातील उद्योगांसाठी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच पहिली पसंदी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रात ५.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आली आहे. गेल्या वर्षी मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात २०२३-२४ मध्ये उद्योग क्षेत्रात विकासाचा दर हा ४.३ टक्के होता. २०२४-२५ मध्ये हाच दर ५.७ टक्के झाला. उद्योग क्षेत्रात विशेषत: निर्मिती (मॅन्यूफॅक्चरिंग) क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रात विकास दर हा ९ टक्के आहे. गेल्या वर्षी सेवा क्षेत्राने चांगला हात दिला आहे.
भक्कम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, प्रगत धोरणे आणि उद्योगस्नेही वातारावरणामुळे राज्यात उद्योग- व्यवसायात वाढ होत असून राज्यातील उद्योग क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात उद्योग क्षेत्रात ५.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली असून ती मागील वर्षाच्या(४.३ टक्के) पेक्षा १.४ टक्के अधिक असेल. यामध्ये वस्तुनिर्माण क्षेत्राचा वाटा सर्वाधिक ५.९ टक्के अपेक्षित धरण्यात आला आहे.
राज्यात डिसेंबर २०२५ पर्यंत ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. तसेच ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२५ या कालावधीत राज्यात झालेली थेट परकीय गुंतवणूक ६ कोटी ९७ लाख ३०४ कोटींची असून ती देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीच्या ३१ टक्केसह सर्वाधिक आहे. तर महाराष्ट्राच्या खालोखाल २० टक्के गुंतवणुकीसह कर्नाटक दुसऱ्या तर १६ टक्के गुंतवणुकीसह गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के हिस्सा आहे. तसेच देशाच्या एकूण निर्यातीमध्ये १५ टक्के निर्यातीसह राज्याने दुसरे स्थान पटकावले आहे. स्वाॅफ्टवेअर निर्यातीमध्ये राज्याचा वाटा देशात २० टक्के आहे.
सहकारी संस्था आणि ठेवीत भरीव वाढ
राज्याच्या विकासात महत्वाचे योजदान देणाऱ्या आणि सहकारातून समृद्धी साधणाऱ्या सहकार क्षेत्रावरील लोकांचा विश्वास पुन्हा एकदा वृद्धींगत होत आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या संख्येत, ठेवीत भरीव वाढ होत असल्याचे आर्थिक पाहणीतून समोर आले आहे.
सहकार चळवळीमुळे कृषी प्रक्रिया, दुग्ध,मत्स्य व्यवसाय, साठवणूक, पणन, पतपुरवठा, बँकिंग, गृहनिर्माण आदी क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत असून ३१ मार्च २५ अखेर राज्यात २.३३ लाख सहकाही संस्था होत्या. यामध्ये सन २०२४ च्या तुलनेत पाच हजार सहकारी संस्थांची भर पडली असून एकूण संस्थांपैकी ५७ टक्के गृहनिर्माण संस्था आहेत. सहकारी संस्थामधील सभासदांमध्ये १० लाखांची वाढ होऊन ६ कोटी १५लाख सभासद सहकार चळवळीत सामिल झाले आहेत.
राज्यभरातील विविध सहकारी संस्थामधील ठेवीमध्ये ५ लाख ३ हजार कोटींवरून ५ लाख २८ हजार ८७० कोटी अशी भरीव वाढ झाली आहे. राज्य सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये गत आर्थिक वर्षात ४६ हजार ६१७ कोटी वरुन ५१ हजार ४९३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. राज्यात २१ हजार८१६ कृषी प्रक्रिया सहकारी संस्था कार्यरत असून त्यांची सभासद संख्या ७२ लाख आहे. राज्यभरात ४४ लाख सभासद असलेल्या १ लाख ३३ हजार ४९० सहकारी गृहनिर्माण संस्था असून, ११ हजार १८३ मजूर कंत्राटी सहकारी संस्थामध्ये ५.६९ लाख सभासद आहेत.
