मुंबई : महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचा भाजप महायुती सरकारचा दावा कागदावरच असून भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि सत्ताधारी बगलबच्च्यांच्या गुंडगिरीमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा ते इतर राज्यात स्थलांतर करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी येथे केली.
गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील ३५ हजार २११ खासगी कंपन्या बंद पडल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील १२ हजार १८१ कंपन्यांचा समावेश आहे. ही माहिती अत्यंत धक्कादायक असून महायुती सरकारचे धोरण उद्योगधंद्यांना पोषक नाही, असेच यातून स्पष्ट होत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
मुंबई–पुणे–नाशिक पट्ट्यातील कंपन्या बंद होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. सरकारचे आकडेच सरकारची पोलखोल करत आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हे मान्य करताना दिसत नाहीत. शब्दच्छल करून असे झालेले नाही हे सांगण्याचा केविलावाणा प्रयत्न ते करत आहेत. बंद पडलेल्या या कंपन्या अकार्यरत होत्या असा त्यांचा दावा आहे, पण कंपन्या बंद पडल्या हे सत्य त्यामुळे लपवता येत नाही, असे सपकाळ म्हणाले.
जमीन देण्याचा निर्णय मागे घ्या
राज्यात उद्योगधंद्यांचे बारा वाजले असताना सरकारने श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची १ हजार ५०० एकर जमीन एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या ‘निबे ग्रुप’ नावाच्या खासगी कंपनीला अकृषिक वापरासाठी ५० वर्षे भाड्याने दिली आहे. कोणतीही निविदा न काढता ही जमीन खासगी कंपनीच्या घशात घालणे हा भ्रष्टाचारच आहे. राज्य सरकार उद्योगाच्या नावाखाली फक्त जमिनी वाटत भ्रष्टाचार करत सुटले आहे. महायुती सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. मुंबईतील सगळ्या जमिनी विकून झाल्यामुळे सरकार आता ग्रामीण भागाकडे वळले आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
