मुंबई: राज्याची अर्थव्यवस्था सन २०४७ पर्यंत पाच लाख कोटी डाॅलर्सची करुन विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना भरीव पाठभळ देण्यात आले आहे. मुंबई, पुण्यात मेट्रोंचे जाळे विस्तारतानाच ग्रामीण भागातील एक हजार लोकवस्तीची गावे सिमेंट काँक्रीट रस्त्याने जोडण्याची तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्यात २३ हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते व पुलांची कामे हाती घेण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्यासाठी भरीव अर्थसाह्य केले. मुंबई- पुणे व पुणे – हैद्राबाद या प्रस्तावित जलदगती रेल्वे प्रकल्पामुळे राज्याच्या सकल उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचे जाळे अधिक भक्कम करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागात गाव- पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे भक्कम करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनेच्या पहिल्या दोन टप्यात ३२ हजार ४५० किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्यात २३ हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते आणि पुलांची कामे हाती घेण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. राज्यातील १ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्यात येणार असून त्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजने अंतर्गत टप्या टप्याने ६ हजार २७२ किलोमीटरचे द्रुतगती महामार्ग आणि १४ हजार ९१९ किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच ४ हजार २४७ किलोमीटरचे पर्यटन परिपथ विकसित करण्यात येणार आहेत. प्रवासी व माल वाहतुकीसाठी सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी १२०० किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग तसेच ६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्यात येणार असून मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये वर्षभरात आणखी ५० किलोमीटर तर सन २०२९ पर्यंत आणखी १६५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.
मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारताना सुमारे २३ हजार ४८७ हजार कोटी रुपये खर्चाच्या गेट वे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रोचा विस्तार आता धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक आणि वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि पुण्यात रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देताना सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २६ हजार २१८ आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) या विभागास १५१५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यता आला आहे.
ठळक वैशिष्ट्ये
- शिवडी- न्हानाशेवा अटल सेतू परिसरात तिसरी तर वाढवण बंदर परिसरात चौथी मुंबई विकसित करणार
- मुंबई- नवी मुंबई विमानतळ यांना मेट्रो मार्गाने जोडणार
- मुंबई महानगर प्रदेशात जलमार्गाचे १२५ किलोमीटरचे जाळे ३४० किलोमीटर पर्यंत विस्तारणार.
- ठाणे- बोरीवली भुयारी मार्गाचे काम जून तर खारघर- तुर्भे भुयारी मार्ग सप्टेंबर२०२८ पर्यंत पूर्ण होणार.
- पनवेल- कर्जत उनगरीय रेल्वे लवकरच सुरु होणार.
- पुण्यात येरवडा- कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड दरम्यान भूयारी मार्ग बांधणार.
- शक्तिपीठ महामार्गाच्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता.
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज एमआयडीसी दरम्यान उन्नत मार्ग बांधणार.
- लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांची सुविधा.
