मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची ओळख तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेचे जागतिक केंद्र म्हणून तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात, नवी मुंबई विमानतळानजीक महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने या इनोव्हेशन सिटीच्या उभारणीची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपविली आहे. त्यानुसार एमएमआरडीएची अंमलबजावणी संस्था, तसेच नियोजन संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रसिद्ध केला.
टाटा सन्स आणि राज्य सरकारमध्ये दावोस येथे करार
राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व क्षेत्रांना चालना दिली जात असून अनेक प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेचे जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करण्यासाठी नवी मुंबई विमानतळानजीक महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जानेवारीत दावोस येथे राज्य सरकार आणि टाटा सन्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. राज्य सरकार आणि टाटा सन्सच्या भागीदारीतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. तर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएची अंमलबजावणी संस्था, तसेच नियोजन संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला.
काय असणार इनोव्हेशन सिटीत?
महाराष्ट्र इनोव्हेशन सिटीत कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर्स, प्रगत उत्पादन उद्योग, नवोपक्रम, संशोधन केंद्र, ऊर्जा निर्मिती, पर्यटन, साठवण व्यवस्था आदी क्षेत्रांतील गुंतवणूक वाढविण्यासाठी भर दिला जाणार आहे.
इनोव्हेशन सिटीच्या उभारणीसाठी जमीन निश्चित करणे, जमिनीचे एकत्रीकरण करणे, भूसंपादन, पायाभूत सुविधांचे नियोजन यासह अन्य जबाबदारी एमएमआरडीएवर नियोजन तसेच अंमलबजावणी संस्था म्हणून असणार आहे. विविध विभाग आणि संबंधित संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही एमएमआरडीएकडे असणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याचे कामही एमएमआरडीएचे असणार आहे. त्यामुळे आता टाटा सन्स आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून इनोव्हेशन सिटीचा आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर इनोव्हेशन सिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
