मुंबई : नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, संशोधन आणि तरुणांच्या नवकल्पनांच्या बळावर राज्याला भविष्यात जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनविण्याचे सामर्थ्य आहे. देशातील एकूण स्टार्टअपपैकी सुमारे १८ टक्के स्टार्टअप राज्यात सुरु होत आहेत. राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत. या परिसंस्थांना संशोधन, उद्योग आणि बाजारपेठेची जोड देऊन नवकल्पनांचे प्रत्यक्ष परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एनसीपीएच्या जमशेद भाभा सभागृहात गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’च्या चौथ्या आवृत्तीतील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ‘मित्रा’चे सदस्य दीपक करंजीकर उपस्थित होते. राज्याला २०३५ पर्यंत संशोधनाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी नवकल्पनांचा वापर हा यंदाच्या स्पर्धेचा विषय होता.
ही केवळ स्पर्धा नसून प्रशासनाच्या भविष्यातील रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष या क्षेत्रांत तरुणांचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यातील नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसह प्रत्येक भागातील युवा संशोधकांना मार्गदर्शन, तंत्रज्ञान, इन्क्युबेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. हॅकेथॉन किंवा स्पर्धा केवळ प्रमाणपत्र देऊन संपता कामा नये, त्यातून पुढे आलेल्या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात ३०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचे नियोजन आहे. राज्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणांतर्गत दोन लाख युवक व व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एआय इन्क्युबेटर्स स्थापन करण्याची तयारी आहे. शासकीय डेटाचाही युवा नवोन्मेषकांना संशोधनासाठी उपयोग करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा संघांनी आरोग्य, कृषी, शिक्षण, वित्त, प्रशासनातील नवोन्मेष आणि शहरी विकास या विषयांवर सादरीकरण केले. मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसच्या अंकिता शिर्के, सिद्धार्थ राजपाल आणि गुरुप्रसाद शेट्टी यांच्या संघाने शहरी विकासावरील नवकल्पनेसाठी पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले. शिक्षण क्षेत्रातील सादरीकरणासाठी आयआयएम मुंबईच्या शुभम पाटील, वरुण दामले व संहिता म्हात्रे यांना एक लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक तीन लाख रुपये शिक्षण विषयावरील सादरीकरण करणाऱ्या संघाला देण्यात आले.
