मुंबई: रेरा कायद्यानुसार गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय प्रकल्पातील घरांची जाहिरात वा विक्री करता येत नाही. त्यानुसार महाराष्ट्रात प्रकल्पांना, विकासकांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. त्यानुसार महारेराकडील प्रकल्प नोंदणीने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या महारेराकडे ५० हजार १६२ गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीकृत आहेत.५० हजार प्रकल्प नोंदणीकृत असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. तामिळनाडू दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर असल तरी या राज्यांच्या आणि महाराष्ट्राच्या प्रकल्पांच्या संख्येत मोठी तफावत आहे. तामिळनाडूत २७ हजार ६०९ तर गुजरातमध्ये १५ हजार ३२२ प्रकल्प नोंदणीकृत आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशातील एकूण गृहनिर्माण प्रकल्पाच्या एक तृतीयांश म्हणजे ३५ टक्के प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहेत.

२०१७ पासून महारेराच्या माध्यमातून रेरा कायद्याची अंमलबजावणी

विकासकांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखत बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने रेरा कायदा आणला आहे. महाराष्ट्रात २०१७ पासून रेरा कायद्याची अंमलबजावणी महारेराच्या माध्यमातून सुरु आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांना महारेरा नोंदणी करावी लागते. ही नोंदणी असल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही, प्रकल्पातील घरांची विक्री करता येत नाही. त्यामुळे विकासकांना आपल्या प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अशा या महारेराच्या स्थापनेला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली असून महारेराने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. महारेराकडे सध्या ५० हजारांहून अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. देशात सर्वाधिक प्रकल्प नोंदणी असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. ५० हजार १६२ प्रकल्प नोंदणी महारेराकडे झाली आहे. त्या ५० हजार प्रकल्पांपैकी १२ हजार ७८८ प्रकल्प पुण्यातील आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ६७४६ प्रकल्पांची नोंदणी झाली आहे तर मुंबई उपनगरातील नोंदणीकृत प्रकल्पांची संख्या ५९०७ अशी आहेत. त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात ५३६० प्रकल्पांची नोंद झाली आहे.

महारेराच्या विभागनिहाय विचार करता कोकण विभागात सर्वाधिक प्रकल्प नोंदणी असून ही संख्या २३ हजार ७७० अशी आहे. तर पुणे विभागात १५ हजार ९३२, उत्तर महाराष्ट्र ४६२१, नागपूर २७६४, छत्रपती संभाजी नगर १८८६ आणि अमरावती ९९७ असे प्रकल्प नोंदणीकृत आहेत.

प्रकल्पांचा जिल्हानिहाय तपशील असा

कोकण परिसर- २३७७०
मुंबई शहर-१२८४

मुंबई उपनगर- ५९०७

ठाणे-६७४६
रायगड-५३६०
पालघर- २८९९
रत्नागिरी- १०८७

सिंधुदुर्ग- ४८७
पुणे परिसर- १५९३२

पुणे – १२७८८
सातारा – १०८८

कोल्हापूर- ७८५
सांगली – ७५७

सोलापूर-५१४
उत्तर महाराष्ट्र परिसर – ४६२१
नाशिक- ३८५४

अहिल्यानगर- ४५५
जळगाव- २३०

धुळे-६५
नंदुरबार- १७
नागपूर परिसर-२७६४

नागपूर- २४९७

चंद्रपूर- २१८
भंडारा- ३६

गडचिरोली-१०
गोंदिया- ३
छ. संभाजीनगर परिसर- १८८६
छ. संभाजीनगर- १३८५

लातूर- १३६
नांदेड- ९७
जालना – ९३

बीड – ९३
धाराशीव- ४६

परभणी- २९
हिंगोली- ०७

अमरावती परिसर-९५७
अमरावती -४२३
वर्धा-२८०
अकोला- ११२
यवतमाळ – ६१

बुलडाणा- ५४
वाशिम- २७

याशिवाय दादरा नगर हवेलीचे १८० आणि दमणचे ५२गृहनिर्माण प्रकल्प आहेत.