मुंबई : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. राज्यभरातील १ लाख ७० हजार ३९९ अर्जदारांपैकी ७८ हजार ४७४ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत जागा वाटप झाले. यामध्ये १०० टक्के गुण मिळवलेल्या सर्व २३ विद्यार्थ्यांबरोबरच ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. या विद्यार्थ्यांना ३ ते ७ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

राज्यातील ४१८ शासकीय आणि ५८६ खासगी अशा एकूण १ हजार ४ आयटीआय संस्थांमध्ये १ लाख ५७ हजार ६६४ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये १ लाख ४२ हजार ५९२ मुले आणि २७ हजार ८०७ मुलींचा समावेश आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७८ हजार ४७४ विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले. यामध्ये ६३ हजार २८९ मुले, तर १५ हजार १८५ मुलींना प्रवेशाची संधी मिळाली. गतवर्षी पहिल्या फेरीसाठी १ लाख ७३ हजार ६७३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ८२ हजार ४१६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यंदा अर्जांची संख्या ३ हजार २७४ ने, तर प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ९४२ ने कमी झाली आहे.

पहिल्या फेरीत कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या ३५ हजार २९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून त्यापैकी ११ हजार ११८ जणांना या यादीत संधी मिळाली. तर ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ असून १०० टक्के गुण मिळविलेल्या सर्व २३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक २२ हजार ५२१ विद्यार्थ्यांना, तर अनुसूचित जातीतील १६ हजार ११२ आणि अनुसूचित जमातीतील १० हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. दुसऱ्या फेरीसाठी विकल्प अर्ज भरण्याची सुविधा ३ जुलैपासून उपलब्ध करण्यात येणार असून पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या किंवा अपग्रेडेशनची संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

अभ्यासक्रमनिहाय जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याचे हमीपत्र देऊन प्रवेश निश्चित करू शकतात.

गुणनिहाय अर्ज व जागा वाटप गुणांची श्रेणी – अर्ज –

वाटप ५० टक्क्यांखाली -३५,२९९

– ११,११८ ५०.०१ ते ५५ -२२,००६ – ८,३१२ ५५.०१ ते ६० – २३,८३९ -१०,१९६ ६०.०१ ते ६५ -२३,६८९- ११,५३७ ६५.०१ ते ७० -२२,१०५- ११,६४६ ७०.०१ ते ७५ -१८,२५६ – १०,२८७ ७५.०१ ते ८० -१३,३१६- ७,९४५ ८०.०१ ते ८५ – ७,८९५- ४,८२९ ८५.०१ ते ९० – ३,३२०- २,१४२ ९०.०१ ते ९५ – ६११ -४१४ ९५.०१ ते – ९९.९९ –

४० २५ १०० टक्के – २३ -२३