मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यास दहावीत १०० टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांनीही पसंती दिली आहे. प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील आकडेवारीनुसार १०० टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केला आहे. तसेच ९५.०१ ते ९९.९९ टक्के गुण मिळवलेल्या ४० विद्यार्थ्यांनी आणि ९०.०१ ते ९५ टक्के गुण मिळवलेल्या ६११ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केला आहे. म्हणजेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या एकूण ६७४ विद्यार्थ्यांनी आयटीआयला पसंती दिली आहे. याशिवाय ८५ ते ९० टक्के गुण मिळवलेल्या ३ हजार ३२० आणि ८० ते ८५ टक्के गुण मिळवलेल्या ७ हजार ८९५ विद्यार्थ्यांनीही प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
यंदा राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी एकूण १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये १ लाख ४२ हजार ५९२ मुले आणि २७ हजार ८०७ मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी ही संख्या १ लाख ७३ हजार ६७३ इतकी होती. त्यामुळे यंदा पहिल्या फेरीपूर्वीच्या अर्जसंख्येत ३ हजार २७४ विद्यार्थ्यांची घट झाली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सोमवारी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार, पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ७ जुलैदरम्यान संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय भरण्याची मुदतही याच कालावधीत राहणार आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे आतापर्यंत नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी संचालनालयाने मोठा दिलासा दिला आहे. अशा विद्यार्थ्यांना ३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत नव्याने ऑनलाइन नोंदणी, अर्जात दुरुस्ती, शुल्क भरणे आणि अर्ज निश्चिती करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, या कालावधीत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्यांऐवजी थेट समुपदेशन (कौन्सेलिंग) फेरीत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आयटीआय प्रवेशाचे पुढील वेळापत्रक
पहिली गुणवत्ता यादी : २ जुलै
पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चिती : ३ ते ७ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी पर्याय भरणे : ३ ते ७ जुलै
दुसरी गुणवत्ता यादी : १२ जुलै
दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती : १३ ते १६ जुलै
तिसऱ्या फेरीसाठी पर्याय भरणे : १३ ते १६ जुलै
तिसरी गुणवत्ता यादी : २१ जुलै
तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती : २२ ते २५ जुलै
चौथ्या फेरीसाठी पर्याय भरणे : २२ ते २५ जुलै
चौथी गुणवत्ता यादी : ३० जुलै
चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चिती : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट
नव्याने नोंदणी व अर्ज निश्चिती : ३ जुलै ते ४ ऑगस्ट
संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक : १ ऑगस्टपर्यंत जाहीर.
