मुंबई : ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून प्रशिक्षण प्रकल्प रावबिण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील विविध आयटीआयमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध हाेण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये सांमजस्य करार करण्यात येत आहे. या करारानुसार छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी शासकीय आयटीआयमध्ये टोयोटा इंडियातर्फे ‘एक्सलन्स सेंटर’ उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर टोयाटो कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) छत्रपती संभाजीनगर विभागातील १४, तर नागपूरमधील तीन आयटीआय संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. १७ प्रयोगशाळांसाठी ५ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर हा केवळ पहिला टप्पा असून शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून दुसऱ्या टप्प्यात (२०२६-२८) अमरावती, नागपूर आणि नाशिक येथे १८, तर पुढच्या टप्प्यात (२०२९-३०) मुंबई आणि पुण्यात १४ अशा ३२ आयटीआयमध्ये जागतिक रोजगाराच्या संधीचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार विद्यार्थ्यांना आवश्यक कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात विविध कंपन्यांसोबत करार करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागातील १४, तर नागपूरमधील तीन आयटीआय संस्थांमधील एकूण १७ अत्याधुनिक प्रयोगशाळांचे गुरूवारी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दृकश्राव्य पद्धतीने एकाच वेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, पंकज पाठक, टोयाटोचे रमेश राव, रवी सोनटक्के, रूपा बोहरा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे पाऊल असून हा सीएसआर निधीचा आगळावेगळा कार्यक्रम आहे. या उपक्रमामध्ये औद्योगिक व्यवस्थापन, आधुनिक कौशल्य आणि औद्योगिक सुरक्षा समाविष्ट करण्यात आली आहे. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, कार्यशाळा व उपकरणांचे आधुनिकीकरण, संबंधित कंपन्यांची औद्योगिक कार्य संस्कृती, कौशल्य ज्ञान, औद्योगिक संस्कार, शरीर व मन यांची क्रयशक्ती यांचा सर्वागीण विकास या प्रयोगशाळांच्या माध्यमाने साधला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक व्हेईकल आणि सोलर टेक्निशियन कार्यशाळा
टीएनएस इंडिया फाऊंडेशनतर्फे आयटीआयमध्ये ईव्ही आणि सौर उर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. कॅम्पस इंडस्ट्रीयल करिअर्स कार्यक्रमांतर्गत सॉफ्ट स्किल्समध्ये उद्योगातील अपेक्षा, नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ग्रीन स्किल्समध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
