मुंबई : कौशल्याधारित रोजगाराच्या वाढत्या संधी, उद्योग क्षेत्रातील मागणी आणि कमी कालावधीत रोजगारक्षम शिक्षण यामुळे मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआय व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांकडे कल वाढत चालला आहे. आयटीआय आणि पॉलिटेक्निकला प्रवेशासाठी यंदा राज्यभरातून १ लाख ३९ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यामध्येही आतापर्यंत आयटीआयसाठी ७१ हजार ४४४ तर पॉलिटेक्निकसाठी ६८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.

आयटीआयला ७१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील ४१८ शासकीय आणि ५८६ खासगी अशा १ हजार ४ आयटीआय संस्थांमध्ये यंदा १ लाख ५७ हजार ६६४ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार सायंकाळपर्यंत ७१ हजार ४४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. आयटीआय प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज, शुल्क भरणे, कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

पॉलिटेक्निकला ६८ हजार अर्ज दाखल

राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० मेपासून सुरुवात झाली आहे. पॉलिटेक्निकच्या राज्यभरामध्ये यंदा एक लाखाहून अधिक जागा आहेत. या जागांसाठी सोमवारी सायंकाळपर्यंत ६८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २२ जूनपर्यंत असल्याने येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा विद्यार्थ्यांना ‘ई-स्क्रुटिनी’ आणि ‘प्रत्यक्ष स्क्रुटिनी’ हे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. घरबसल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची सुविधा मिळाल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी २४ जूनला, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला जाहीर होणार आहे. उद्योग क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमुळे दहावीनंतर थेट तांत्रिक शिक्षणाचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.