मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिक्षण घेणाऱ्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील संस्था ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसते, आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, अशा वेळी मानवी सुरक्षेला प्राधान्य देऊन यामध्ये युवांचा सहभाग वाढवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला सहकार्य होण्यासाठी आपत्ती बचावकार्य करणारी यंत्रणा तयार करण्याच्या उद्देशाने राज्यातील आयटीआयमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार येणार आहे. यासाठी ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’सोबत बुधवारी कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सशक्त भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विभागाकडून पारंपरिक खेळांचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देण्यासाठी राज्यभरातील आयटीआयमध्ये क्रीडा महाकुंभही आयोजित करण्यात येत आहे. आता याच शृंखलेत जनसेवेच्या भावनेतून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबवून देशसेवेचे काम आयटीआयमार्फत होणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. तसेच आपत्तीचे व्यवस्थापन आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूपही त्यानुसार बदलले असून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी यावेळी सांगितले.
‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार असल्याचे अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी यावेळी सांगितले. शहरी आणि ग्रामीण भागातील विविध आपत्तीचा अभ्यास करून अकादमीने हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. आपत्तीतील उपाययोजना आणि बचावकार्य याचे प्रामुख्याने प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अकादमीचे प्रतिनिधी हरीश महाजन यांनी दिली. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

