Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!; राज्यातील वाहनांवर कन्नडिगांचा हल्ला; राज्यभर तीव्र पडसाद | Maharashtra Karnataka border dispute Activists Kannada Rakshana Vedike attack on vehicles | Loksatta

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!; राज्यातील वाहनांवर कन्नडिगांचा हल्ला; राज्यभर तीव्र पडसाद

कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले.

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!; राज्यातील वाहनांवर कन्नडिगांचा हल्ला; राज्यभर तीव्र पडसाद
महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पुण्यात कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा लिहिण्यात आल्या.

कोल्हापूर, पुणे, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मंगळवारी तापला. कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौरा लांबणीवर टाकल्याने आधीच टीकेचे धनी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी वेगाने हालचाली करून सीमावादाबाबत कठोर भूमिकेची ग्वाही दिली.

जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर सीमाप्रश्न पुन्हा तापला. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या राज्याच्या मंत्र्यांचा मंगळवारचा नियोजित बेळगाव दौरा लांबणीवर टाकूनही कर्नाटकच्या कुरापती कायम राहिल्या. कर्नाटकातील हिरे बागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घालून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. जवळपास सहा ट्रकची नासधूस करण्यात आली. कर्नाटक पोलीस आणि वेदिकेचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली.

हेही वाचा >>> Maharashtra Karnataka Dispute : संयमाचा अंत पाहू नका; शरद पवार यांचा कर्नाटक सरकारला इशारा

या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. पुण्यात स्वारगेट येथून कर्नाटकात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाडय़ांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र’ असे घोषवाक्य लिहून कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम

कोल्हापुरातही या घटनेचा निषेध करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित असून, त्याला कर्नाटकातील भाजप सरकारचे पाठबळ असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. कर्नाटकची गुंडगिरी अशीच सुरू राहिली तर त्याला महाराष्ट्रातूनही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रकवरील हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली काच फोडून शिवरायांचा अवमान करण्यात आला आहे. त्याचा निषेध करत माजी खासदार संभाजीराजे यांनी या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा >>> कर्नाटकने डिवचले तरीही, जतमधील राजकारणी श्रेयवादात दंग

मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, लवकरच भेट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला हिंसक वळण लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात मंगळवारी रात्री दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखण्याबाबत त्यांच्यात मतैक्य झाले. ट्रकवरील हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. शिंदे आणि बोम्मई यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका: शरद पवार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमा प्रश्नाबाबतची विविध विधाने देशाचे ऐक्य धोक्यात आणणारी आहेत. त्यातून काही अघटित घडल्यास त्यास बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. पण, आमचाही संयम सुटू शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. ‘अरे’ला ‘कारे’ हे उत्तर द्यायची हिंमत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, असे नमूद करत अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याची तारीख जाहीर करण्याची मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना हे प्रकार घडणे चुकीचे आहे. देशात संविधानाने कोणालाही कुठेही जाण्याचा, राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणतेही राज्य कोणालाही रोखू शकत नाही. संविधानातील तरतुदींचे पालन राज्य सरकार करीत नसेल, तर आम्हाला केंद्राकडे जावे लागेल. याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा