मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे २०२६ सालचे ‘मधुमित्र’ व ‘मधु-सखी’ पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. या शिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे, पुण्याचे संजय मारणे, कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष सन्मानासाठी निवड केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.
‘मधु मित्र’ आणि ‘मधु सखी’ पुरस्काराचे वितरण जागतिक मधमाशी दिनानिमित्त, २० मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. महाराष्ट्रातील मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०२३ पासून पुरस्कार सुरू केले आहेत. या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.
१७ कोटी रुपयांची तरतूद
राज्यात मधमाशीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या मध संचालनालयामार्फत प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, मध महोत्सव, ‘मधाचे गाव’ योजना तसेच मधुमित्र-मधुसखी पुरस्कार, असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सभापती साठे यांनी सांगितले. ‘मधाचे गाव’ योजनेसाठी राज्य शासनाने १७ कोटी रुपयांची तरतूद केली असून, पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये काम सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत ३४८ मधपाळांना प्रशिक्षण देण्यात आले असून १७५० मधपेट्या, संरक्षण पोशाख, मध यंत्र आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.
या योजनेमुळे निसर्ग संवर्धन, मध उत्पादनवाढ, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेली ६५ वर्षे कार्यरत असून, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आणि मध केंद्र योजना यांची अंमलबजावणी मंडळामार्फत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
१२ मध गावांना मान्यता
राज्यात पारंपरिक मध उत्पादनाला चालना देण्यासाठी शासनाने १२ मधगावांना मान्यता दिली असून, त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील घोलवड, नांदेड जिल्ह्यातील भंडारवाडी, नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर, हिंगोली जिल्ह्यातील काकडदाभा, नाशिक जिल्ह्यातील चाकोरे, अहिल्यानगर जिल्ह्यातील उडदावणे, परभणी जिल्ह्यातील शेलमोहा, वर्धा जिल्ह्यातील सिंधीविहीर, सातारा जिल्ह्यातील सालोशी, अमरावती जिल्ह्यातील आमझरी, धुळे जिल्ह्यातील रामी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे या गावांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मध उत्पादकांना बाजारपेठ, प्रशिक्षण व आर्थिक सक्षमीकरणाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सभापती साठे यांनी यावेळी दिली.
