मुंबई : राज्यात खरीप हंगाम २०२६-२७ मधील पेरणी ३१ ऑगस्टअखेर १ कोटी ३६ लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत यंदा ९५ टक्के पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे आणि हंगामा दरम्यान पावसात खंड पडल्यामुळे पेरणी क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत सुमारे आठ लाख हेक्टरने घट झाली आहे. विभागनिहाय पेरण्यांमध्ये मोठी तफावत असून कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली आहे. ऑगस्टअखेर राज्यातील सर्व पेरण्या संपतात त्यामुळे आता पेरण्यांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरीप पिकांचे २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार हेक्टर आहे. यंदा ३१ ऑगस्टपर्यंत १ कोटी ३६ लाख ५६ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. मागील वर्षी २९ ऑगस्टपर्यंत १ कोटी ४२ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदाचे पेरणी क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेतही कमी आहे. राज्यातील एकूण पेरणी ९५ टक्क्यांवर पोहोचली असली तरी जिल्हानिहाय चित्र समान नाही. काही जिल्ह्यांनी सरासरी क्षेत्र ओलांडले आहे, तर काही जिल्हे अद्याप सरासरीच्या ७० ते ८० टक्क्यांच्या आसपास आहेत.

यंदाच्या मोसमी पावसाचे हंगामात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी वाढली. मात्र, ऑगस्ट महिना बहुतांश कोरडा गेला त्यामुळे पेरण्याच्या टक्केवारीत वाढ होऊ शकली नाही. ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास पिके जळून जाण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे.

पुणे विभागात सरासरीपेक्षा जास्त पेरा

पुणे विभागाने यंदा पेरणीत आघाडी घेतली असून, विभागातील पेरणी सरासरीच्या १०१ टक्क्यांवर पोहोचली आहे. विभागात १२ लाख ६६ हजार ८३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये सरासरीच्या १०४ टक्के, पुण्यात १०० टक्के, तर अहिल्यानगरमध्ये ९९ टक्के पेरणी झाली आहे. नाशिक विभागात १९ लाख ८५ हजार ३५२ हेक्टरवर पेरणी झाली असून सरासरीच्या ९८ टक्के क्षेत्राची पूर्तता झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक, म्हणजे १०१ टक्के पेरणी झाली आहे. धुळे ९८, जळगाव ९७ आणि नंदुरबार ९० टक्क्यांवर आहे.

विदर्भातही जिल्हानिहाय मोठी तफावत निर्माण झाली आहे. अमरावती विभागात २९ लाख ८३ हजार ६०१ हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरीच्या ९४ टक्के क्षेत्राची पूर्तता झाली आहे. यवतमाळमध्ये ९३ टक्के, वाशिममध्ये ९३ आणि अमरावतीमध्ये ९४ टक्के पेरणी झाली आहे.

नागपूर विभागात सरासरीच्या ९४ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्याने सरासरी ओलांडत ११३ टक्के पेरणी केली आहे. याउलट चंद्रपूरमध्ये ८८, नागपूर आणि भंडाऱ्यात प्रत्येकी ९० टक्के पेरणी झाली आहे.

कोकण विभाग सर्वाधिक पिछाडीवर

कोकण विभागातील खरीप पेरणी सरासरीच्या केवळ ८३ टक्क्यांवर आहे. विभागात ३ लाख २३ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक कमी, म्हणजे सरासरीच्या ६७ टक्के पेरणी झाली आहे. रत्नागिरीत ७१, सिंधुदुर्गात ८४, तर ठाणे आणि पालघरमध्ये ९६ टक्के पेरणी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या ९३ टक्के, तर लातूर विभागात ९४ टक्के पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात जालना जिल्ह्यात पेरणी ९० टक्क्यांवर आहे. लातूर विभागात हिंगोली सर्वाधिक पिछाडीवर असून, तेथे सरासरीच्या केवळ ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदेडमध्ये ९७ टक्के पेरणी झाली आहे.

सांगली-कोल्हापूरची पेरणीही कमी

कोल्हापूर विभागात ६ लाख ७२ हजार ७५४ हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ९३ टक्के आहे. सातारा जिल्हा ९९ टक्क्यांवर असताना सांगली ८९ आणि कोल्हापूर ८७ टक्क्यांवर आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांची पेरणी सरासरीपेक्षा लक्षणीय कमी आहे.

जिल्हानिहाय ठळक आकडे (टक्के)

गोंदिया – सरासरीच्या ११३%

सोलापूर: १०४%

नाशिक: १०१%

पुणे: १००%

नांदेड: ९७%

सांगली: ८९%

कोल्हापूर: ८७%

रायगड: ६७%

हिंगोली: ८१%