मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा गुरूवारी सुरळीत पार पडली. विधि सीईटीसाठी नोंदणी केलेल्या ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांपैकी दोन दिवसांमध्ये ६९ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये पहिल्या दिवशी ३५ हजार १९५ विद्यार्थी, तर दुसऱ्या दिवशी ३४ हजार २७८ विद्यार्थी उपस्थित होते. दोन्ही दिवस राज्यभरात परीक्षेदरम्यान कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यानुसार १ व २ एप्रिल रोजी राज्यभरातून विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्यात आली. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १५६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. पहिल्या दिवशी दोन सत्रांमध्ये परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
विधि तीन वर्ष सीईटीसाठी ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी राज्याभरातील ४१ हजार ६५९ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ३५ हजार १९५ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेला उपस्थित राहण्याचे प्रमाण ८४ .४८ टक्के होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी ४१ हजार ८३४ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ३४ हजार २७८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच ८१ .९४ टक्के विद्यार्थी उपस्थिती होते.
पहिल्या दिवशी ३५ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
१ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान झालेल्या सीईटीमध्ये २० हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३ हजार १०७ विद्यार्थी अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत झालेल्या परीक्षेला २० हजार ९४८ पैकी १७ हजार ५९१ विद्यार्थी उपस्थित होते. तर ३ हजार ३५७ विद्यार्थी अनुपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी ३४ हजार विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती
सकाळच्या सत्रात २० हजार ९३३ पैकी १७ हजार ११३ विद्यार्थी उपस्थित होते. त्यामुळे उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८१.७५ टक्के इतके होते. सकाळच्या सत्रामध्ये ३ हजार ८२० विद्यार्थी अनुपस्थित होते. दुपारच्या सत्रात २० हजार ९०१ पैकी १७ हजार १६५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे उपस्थित राहण्याचे प्रमाण हे ८२.१३ टक्के इतके होते. या परीक्षेला ३ हजार ७३६ विद्यार्थी अनुपस्थित होते.
