मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन कॉंग्रेसचे पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्यानंतर कॉंग्रेसची मते फुटल्याची स्पष्ट कबुली काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकार म्हणून आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे सूचक विधानही थोरात यांनी केले.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रसचे चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप हे दोन उमेदवार होते. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. पक्षाने चंद्राकांत हंडोरे यांना पहिली पसंती दिली होती. तर भाई जगताप यांना दुसरी उमेदवारी देत इतर मतांची तजवीज छोटे पक्ष व अपक्षांकडून करण्यास सांगितले होते. काँग्रेसच्या ४४ आमदारांची पहिल्या पसंतीची मते या दोन्ही उमेदवारांना पडणे अपेक्षित होते. हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ व जगताप यांना १९ म्हणजे एकूण ४१ मते मिळाली. याचा अर्थ तीन मते काँग्रेसच्या उमेदरावारांना कमी मिळाली.

विधानभवनात माध्यमांशी बोलताना थोरात यांनी काँग्रेसची मते कमी झाली, अशी स्पष्ट कबुली दिली. ही मते कुठे गेली, आघाडीमध्ये नाराजी आहे, का यावर मात्र त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.  काँग्रेसची मते कमी झाली, तो आमचा दोष आहे, विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून मी त्याची जबाबदारी स्वीकारत आहे, माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार असल्याचे थोरात म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, आता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. सरकार म्हणून आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल, असे सूचक उद्गार थोरात यांनी काढले.