मुंबई : गेला महिनाभर राज्यभरातील आठ शहरांमधील महाविद्यालयीन रंगकर्मींची उत्तम एकांकिका सादर करण्यासाठी सुरू असलेली धडपड, प्राथमिक फेरी आणि त्यानंतर विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी घेतलेले कष्ट, ताण, ज्यासाठी होता तो क्षण समोर येऊन ठेपला आहे. आज, शनिवारी रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात आठ विभागांतून जेत्या ठरलेल्या आठ एकांकिकांमध्ये विजयासाठी चुरशीची स्पर्धा होणार आहे.

राज्यभरातील उदयोन्मुख रंगकर्मींना महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ला आजमावून पाहण्याची संधी देण्याबरोबरच कलाक्षेत्रातील विविध कवाडे खुली करून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा दशकपूर्तीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून या पर्वाचा शेवटचा अंक शनिवार, २० डिसेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वेळी आठ विभागांत पार पडलेल्या प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीत उत्तमोत्तम एकांकिका नाट्यरसिकांना पाहता आल्या. आता महाअंतिम फेरीत एका महाविद्यालयाची एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.

महाअंतिम फेरीच्या प्रवेशिका रवींद्र नाट्यमंदिर येथे सकाळी ८.३० पासून उपलब्ध होतील. कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून काही जागा मान्यवरांसाठी राखीव आहेत.

महाअंतिम फेरीतील एकांकिका

ठाणे – थिम्मक्का – सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय

मुंबई – जब वुई मेटा – म. ल. डहाणूकर महाविद्यालय

कोल्हापूर – हाफ वे – राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, ईश्वरपूर

पुणे – वामन आख्यान – मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड

नाशिक – राशोमोन – लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय

नागपूर – ओझोन – श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती</p>

रत्नागिरी – तुकारामाची टोपी – फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय

छत्रपती संभाजीनगर – बुजगावणं – नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

रत्ना पाठक शाह यांचे विचार ऐकण्याची संधी

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आणि त्याला लाभणारे प्रमुख पाहुणे दोन्ही खास असतात. यंदाही ‘लोकांकिका’ पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या युवा रंगकर्मींना, मान्यवरांना यावेळी अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. युवा रंगकर्मींशी संवाद साधण्यावर रत्ना पाठक शाह यांचा भर असल्याने याच ‘लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी झालेले, विजेते ठरलेले लेखक-दिग्दर्शक रावबा गजमल, लेखक-दिग्दर्शक, अभिनेता अजय पाटील आणि नाट्यस्पर्धेचा पुरेपूर अनुभव घेऊन सध्या शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेली लेखिका अपूर्वा भिलारे हे तिघेही तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत.

कधी? – शनिवार, २० डिसेंबर २०२५

वेळ – सकाळी ९ वाजता

कुठे? – रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी