मुंबई: दिवाळीचे औचित्य साधत महावितरणने राज्यातील वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहीर केली असून शुक्रवारपासून ही योजना सुरू होईल. यामध्ये लघु व उच्चदाबाच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित बिगरकृषी वीजग्राहकांसाठी ही योजना असून अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. तर उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. यासह मागणीनुसार पुनर्जोडणी तात्काळ मिळणार आहे.
महावितरणाच्या प्रकाशगड मुख्यालयात मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक धनंजय औंढेकर (संचालन), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन) आदी उपस्थित होते.
महावितरणची कृषी आणि सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळून इतर सर्व घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या १८३५ उच्चदाब आणि ३४ लाख ८४ हजार ५१३ लघुदाब अशा ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे ७ हजार ६५० कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी अभय योजना आणण्यात आली असून या योजनेमुळे २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाबाच्या १९ आणि लघुदाबाच्या २ लाख ६० हजार ८१० अशा २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यात १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे संपूर्ण व्याज माफ होणार आहे.
अभय योजनेनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र असतील. तसेच महावितरणशी सलग्न विज वितरण कंपन्यांच्या ग्राहकांनाही ही योजना लागू असेल.
या योजनेत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याजाची आणि विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येईल. मूळ थकबाकीची रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची ग्राहकांना सुविधा आहे. ही योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा फायदा देण्यात येईल. यात लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना ३ वर्षांपर्यंत वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के तर ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरुपी खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. तसेच लघुदाब घरगुती व व्यावसायिक वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० टक्के व १५ टक्के सूट मिळेल. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के अगाऊ भरल्यास उर्वरित रकमेसाठी ६ समान व्याजमुक्त मासिक हप्ते तर उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार व्याजमुक्त ३ ते ६ हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.
यासोबतच मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत आहे अशा ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जाईल. उल्लेखनीय म्हणजे या योजनेत सहभागी सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणण्यासाठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे ग्राहक अर्ज करू शकतील.
