Sanjay Raut on BMC Election Results 2026 : राज्यात २९ महापालिकांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. मात्र, मतदान पार पडल्यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली नव्हती. मतदानाची टक्केवारी जाहीर होण्याआधीच एक्झिट पोल्स आल्याने विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर आरोप केला आहे.
टक्केवारीच्या आधी एक्झिट पोल आले
“किती टक्के मतदान झालंय, हे आकडे आज सकाळपर्यंत आले नव्हते. एक कोटी लोकांनी मतदान केलं असेल पण, किती टक्के मतदान झालं हे निवडणूक आयोग सांगत नव्हतं. पण एक्झिट पोल टक्केवारीच्या आधी आले. मतदान सुरू असतानाच काही ठिकाणी एक्झिट पोल आले”, असा आरोप संजय राऊत यांनी केलं.
मतदानादरम्यान करायचे ते घोटाळे त्यांनी केले
“एक्झिट पोल येऊद्या, अजून काही पोल येऊद्या. लोकांनी मतदान केले आहे. मतदनात ज्यांना घोटाळे करायचे होते, त्यांनी ते केले आहेत. पैशांचं वाटप झालेलं आहे. शाई पुसली गेली आहे. तरीही आम्ही खात्रीने सांगतो की निकाल लागू द्या. तमाम मराठी माणसाने, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या युतीला मतदान केलं आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपाच्या नेत्यांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट
“काल ६ वाजता भाजपाचे काही प्रमुख नेते आणि पालिका आयुक्त गगराणी यांची प्रदीर्घ मिटिंग झाली. त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही आहेत. बाहेर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. मतदार यादीतून त्यांनी नावं वगळली होती आणि सांगण्यात आलं की महापालिका आयुक्त कार्यालयात नाहीत. पण ते एका खोलीत बसून भाजपाबरोबर बैठका घेत होते. कशाकरता या बैठका? तुमचा काय राजकीय अजेंडा ठरला आहे?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.
…तर ठाकरे बंधूंचा महापौर येईल
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काहीच हरकत नव्हती. तरीही आम्ही जिद्दीने प्रचार करून लोकांपर्यंत पोहोचलो. सत्ताधारी लोकशाही मानत नसले तरीही आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवली आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की लोकांनी केलेलं मतदान जर इव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचा महापौर होईल. यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे, म्हणून ते खात्रीने सांगतात की १४०-१२५ जागांवर जिंकतोय”, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबईच्या हितासाठी सोबत घेऊ
“मुंबईला वाचवण्याकरता जे जे सोबत येतील, त्यांना सोबत घेतलं जाईल. ते पक्ष स्वतःहून सोबत येतील”, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
