Maharashtra Govt Recruitment 2026: राज्याच्या महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत(आऊटसोर्सिंग )भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. या पदावरील अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.

तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. लवकरच या नवीन नोकरभरती सुरू होणार आहे.