मुंबई : मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए / एमएमएस ) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत २५ फेब्रुवारी रोजी संपली. या परीक्षेसाठी १ लाख ८० हजार ७९२ अर्ज आले आहेत. या विद्यार्थ्यांकडून नोंदणी अर्ज करताना काही चूक झाली असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) २८ ते २ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करता येणार आहे.

एमबीए / एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला १० जानेवारी २०२६ पासून सुरुवात झाली. नोंदणीसाठी अंतिम तारीख १२ फेब्रुवारी होती. त्यानंतर त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पहिल्यांदा, तर २५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. यंदापासून एमबीए / एमएमएस या अभ्यासक्रमाची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या दोन संधी देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

त्यानुसार या अभ्यासक्रमासाठी पहिल्या संधीसाठी १ लाख ३२ हजार ७९८, तर दुसऱ्या संधीसाठी ४७ हजार ९९४ विद्यार्थ्यांनी अंतिम नोंदणी केली आहे. दोन्ही संधी मिळून १ लाख ८० हजार ७९२ विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार आहेत. एमबीए / एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्कासह अर्ज पूर्ण भरलेल्या विद्यार्थांकडून अनवधानाने काही चुका होण्याची शक्यता आहे. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी किंवा प्रवेश प्रक्रियेच्या वेळी कोणतही अडचण येऊ नये यासाठी सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार २८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जामध्ये ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी, लिंग व दोन संधी यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

एमबीए/ एमएमएससाठी पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा ९ मे २०२६ रोजी होणार आहे. ही सीईटी परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

एमबीए / एमएमएस प्रवेश परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी

– २०२३-२४ : १,३०,९२७

– २०२४-२५ : १,५२,९११

– २०२५-२६ : १,५७,२८१

– २०२६-२७ : १,८०,७९२

(दोन्ही संधी मिळून )