मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सादर केलेल्या अर्जांची छाननी १८ मार्च रोजी परिषदेच्या कार्यालयात होणार होती. मात्र १७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर अचानक नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्याचे ठिकाण बदलण्यात आल्याचे परिषदेकडून उमेवदारांना कळविण्यात आले. अचानक ठिकाण बदलल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून छाननीसाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होणार असल्याचा दावा करत डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक तब्बल ९ वर्षांनी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नऊ सदस्यांच्या होणाऱ्या या निवडणुकीसंदर्भातील सूचना २ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मात्र परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना १२ मार्चपर्यंत नामनिर्देशन अर्ज करण्याची मुदत दिली होती. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन अर्जाची छाननी १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता परिषदेच्या कार्यालयातच होणार असल्याचे सांगण्यात येत होते.
त्यानुसार राज्याच्या कानाकोपऱ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉक्टरांनी एक दिवस अगोदरच म्हणजे १७ मार्च रोजीच मुंबईमध्ये येण्यास सुरुवात केली. मुंबईत आलेल्या डॉक्टरांनी परिषदेच्या कार्यालयाच्या आसपासच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. निवडणुकीसाठी तब्बल ९६ उमेदवारांचे अर्ज आले असून, परिषदेच्या कार्यालयामध्ये इतक्या उमेदवारांची बसण्याची व्यवस्था होणे अशक्य असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननी सुरू होण्यास १८ तास शिल्लक असताना अचानक ठिकाण बदलण्याबाबत उमेदवारांना कळविण्यात आले.
अर्जाची छाननी परिषदेच्या चिंचपोकळी येथील कार्यालयाऐवजी सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसरातील शासकीय दंत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात येणार असल्याचे सायंकाळी ४ वाजता उमेदवारांना ईमेल व दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले. उमेदवारांना अर्जाच्या छाननीसाठी प्रस्तावक व अनुमोदक यांना सोबत आणणे आवश्यक असते. अचानक बदललेल्या ठिकाणामुळे डॉक्टरांना संबंधित जागेवर ठरलेल्या वेळी प्रस्तावक व अनुमोदक यांच्यासह उपस्थित राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अचानक बदललेल्या ठिकाणामुळे उमेदवारांकडून परिषदेच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परिषदेकडून रावबिण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनागोंदी कारभार दिसून येत आहे. निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी निवेदन दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. – डॉ. तुषार जगताप, संयोजक, हीलिंग हँड्स युनिटी पॅनेल
उमेवारी अर्ज १२ मार्च रोजी भरण्यात आले. त्यावेळी किती उमेदवारांनी अर्ज भरले हे स्पष्ट झाले असणार मग अर्ज छाननीचे ठिकाणाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक अधिकाऱ्यांना पाच दिवस कसे लागतात. सायंकाळी ४ वाजता ठिकाण बदलण्याबाबत उमेदवारांना कळविणे हे लोकशाहीला धरून नाही. यामुळे उमेदवारांना छाननीच्या ठिकाणी पोहचण्यास त्राास होऊ शकतो. -डॉ. सुहास पिंगळे, माजी सदस्य, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
अर्ज छाननी प्रक्रिया एकाच टप्प्यात पार पाडणे आवश्यक असते. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे कार्यालयातील सभागृह छोटे आहे. या सभागृहामध्ये एकाच ९६ उमेदवार बसणे अशक्य आहे. त्यामुळे डॉक्टरांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – सुनील धोंडे, निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
