मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिलेल्या ‘आयएमए अधिकृत’ पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या सहभागामुळे आयएमएबरोबरच एमएमसी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली जात असल्याचा आरोप करत आयएमएमधील ज्येष्ठांनी आक्रमक भूमिका घेतली. शड्डू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ‘आयएमए एमएमसी’ पॅनेलने भाजप पुरस्कृत ‘आयएमए अधिकृत’ पॅनेलला पराभवाची धुळ चारली. ‘आयएमए एमएमसी’ पॅनेलचे नऊपैकी आठ उमेदवार विजयी झाले, तर ‘आयएमए अधिकृत’चा फक्त एक उमेदवार विजयी झाला आहे. हा उमेदवारही भाजपने ‘आयएमए एमएमसी’ पॅनेलमधून फोडलेला होता.
डॉक्टरांची स्वायत्त संघटना असलेल्या एमएमसीची यंदाची निवडणुकी विविध कारणांनी गाजली. एमएमसीचे सदस्य असलेल्या ७० हजार डॉक्टरांची मतदारयादीतून वगळलेली नावे, राज्य सरकारने निवडणूक रद्द करून नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा घेतलेला निर्णय, न्यायालयाने फेटाळलेला हा निर्णय, एमएमसीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टरांची महत्त्वाची संघटना असलेल्या आयएमएमध्ये भाजपने पाडलेली फूट, प्रचारात भाजपच्या पंचायत समिती सदस्यापासून थेट प्रदेशाध्यक्षांनी घेतलेला सहभाग यामुळे एमएमसीच्या या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत ‘आयएमए अधिकृत’ पॅनेल विजयी होण्याची चिन्हे दिसू लागली होती.
मात्र एमएमसीबरोबरच आयएमएचेही अस्तित्त्व पणाला लागल्याने राज्यातील आयएमएच्या माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी एकत्र ‘आयएमए एमएमसी’ पॅनेल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले. त्यामुळे एमएमसीचीही निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध ‘आयएमए एमएमसी’ असेच चित्र होते. भाजपच्या सहभागामुळे एमएमसीची स्वायत्तत्ता धोक्यात आल्याचा जोरदार प्रचार ‘आयएमए एमएमसी’कडून करण्यात आला. परिणामी, राज्यातील आयएमएच्या जुनेजाणत्या डॉक्टरांनी ‘आयएमए एमएमसी’ला प्राधान्य दिले. बुधवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता संपली, त्यावेळी ‘आयएमए एमएमसी’ने भाजप पुरस्कृत ‘आयएमए अधिकृत’चा दणदणीत पराभव केला.
निवडणुकीमध्ये आयएमएचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या डॉक्टरांनी एमएमसीची स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी ‘आयएमए एमएमसी’ला पाठिंबा दिला. त्यामुळे ‘आयएमए एमएमसी’चे नऊपैकी आठ उमेदवार निवडून आले. ‘आयएमए अधिकृत’चा फक्त एक उमेदवार निवडून आला. हा उमेदवारही सुरुवातील ‘आयएमए एमएमसी’ या पॅनेलमध्ये होता. त्यानंतर त्याला ‘आयएमए अधिकृत’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
विजयी उमेदवार
ठाण्यातील डॉ. संतोष कदम यांना सर्वाधिक ७०३० मते मिळाली. त्यानंतर डॉ. संजय कदम (६९०१), डॉ. निलेश निकम (५९८८), डॉ. संजय देशपांडे (५८०४), डॉ. सुनील इंगळे (५६३०), डॉ. अनिलकुमार पाटील (५५५०), डॉ. मंगेश गुलवडे (५५०६), डॉ. उज्ज्वला कराड (५३४५), डॉ. अनिल पेचणेकर (५१६७) हे उमेदवार विजयी झाले.
एमएमसीच्या या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने उडी घेतली होती. परंतु त्या पक्षाच्या पुरस्कृत पॅनेलला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आमचे नऊपैकी आठ उमेदवार निवडून आले. या निकालातून राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने धडा घेऊन अशा छोट्या निवडणुकांमध्ये उतरू नये. तसेच संस्थांची स्वायत्तता टिकवायला मदत करावी.- डॉ. सुहास पिंगळे, माजी सदस्य, एमएमसी
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निवडणूक अधिकारी सुनील धोंडे, वैद्यकीय शिक्षण सहसचिव आणि हाफकिन जीव औषधनिर्माण महामंडाचे संचालक यांनी चांगल्या प्रकारे निवडणूक पार पाडली. पहाटे ४ वाजता निर्णय जाहीर केला. आयएमएचे सर्व माजी राज्य अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन पॅनेल केले होते. या पॅनेलला डॉक्टरांनी पसंती दिली. या निकालानंतर आता राज्य सरकारने लवकरात लवकर पुढील प्रक्रिया पूर्ण करून संस्थेचा कारभार सुरू करावा.- डॉ. संतोष कदम, माजी अध्यक्ष, आयएमए
