मुंबई : राज्य वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची राज्य सरकारने घोषणा केली. शासनाने नामनिर्देशित केलेल्या पाच सदस्यांसह नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या नऊ सदस्यांचा यात समावेश आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षांचा राहणार आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. शासनाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांमध्ये डॉ. अजय केणी, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. राजीव येरवडेकर आणि डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांचा समावेश आहे. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या सदस्यांमध्ये डॉ. संतोष कदम, डॉ. संजय कदम, डॉ. निलेश निकम, डॉ. संजय देशपांडे, डॉ. सुनील इंगळे, डॉ. अनिलकुमार पाटील, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. उज्ज्वला कराड आणि डॉ. अनिल पाचनेकर यांचा समावेश आहे.
राज्यातील वैद्यकीय व्यवसायाचे नियमन, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी आणि वैद्यकीय आचारसंहितेच्या पालनाच्या दृष्टीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. नव्या सदस्यांच्या नियुक्तीमुळे परिषदेचे कामकाज अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले.
