मुंबई : गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) मतदार यादीमध्ये अनेक गंभीर त्रुटी होत्या. त्यामुळे काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याने अखेर ही निवडणूक लांबणीवर पडली. न्यायालयाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये कोणतीही गंभीर त्रुटी राहू नये यासाठी डॉक्टरांची संघटनांनी एमएमसीचे निबंधक डॉ. राकेश वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नव्या निवडणुकीची तयारी करीत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम, १९६७ च्या अध्याय २, भाग ३ मधील नियम क्रमांक ५ नुसार मतदार यादी तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी निबंधकांवर आहे. ही यादी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या अधिकृत नोंदवहीतूनच तयार केली जाणे आवश्यक असल्याचे नियमात स्पष्ट नमूद आहे.

मागील कार्यकाळात निबंधकांनी कायदा व न्याय विभागाचा सल्ला न घेता, कोणतीही पूर्वसूचना किंवा सुनावणी न देता तब्बल ७० हजारांहून अधिक नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची नावे मनमानी पद्धतीने मतदार यादीतून वगळली होती. डॉक्टरांची नावे आधी वैद्यकीय नोंदवहीतून वगळल्याशिवाय मतदार यादीतून काढता येत नाही, असा स्पष्ट नियम असूनही त्याचे उल्लंघन करण्यात आले होते. डॉक्टरांची नावे वगळल्याने अनेकजण निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी आवाज उठवला होता. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांमध्ये अनेक नामवंत डॉक्टरांचा समावेश होता.

ही बाब लक्षात घेता नव्याने घेण्यात येत असलेल्या निवडणुकीमध्ये या गंभीर त्रुटी टाळण्यात यावी, यासाठी परिषदेने मतदार यादीच्या तयारीसंदर्भात कोणतेही नवे नियम, सुधारित मार्गदर्शक तत्त्वे किंवा अद्ययावत प्रक्रिया निश्चित केल्या असतील, तर त्या अधिकृतपणे सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना कळवाव्यात अथवा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनल’कडून करण्यात आली आहे.