मुंबई: राज्यात शहरी भागात जलद आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी तब्बल २ लाख ८० हजार ७५५ कोटी रुपये खर्चाचे ६८३ किलोमीटर लांबींचे मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. सध्या १७४ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत आहेत. तर येत्या चार वर्षात आणखी ३०० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. मेट्रो प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी नगरविकास विभागास दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यभरातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे. सध्या राज्यात १७४ किलोमीटर मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून २९१ किलोमीर लांबीच्या मेट्रो मार्गांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय १३० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत असून ८७.१५ किलोमीटर मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे.
राज्यात सध्या २ लाख ८० हजार ७५५ कोटींचे मेट्रो प्रकल्प सुरु असून यामध्ये केंद्र सरकारचा एकूण हिस्सा २७ हजार २१६ कोटी, तर राज्य सरकारचा थेट हिस्सा ५० हजार २५० कोटी आहे. याशिवाय एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांच्या माध्यमातून ७५ हजार ७२९ कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. तर उर्वरित निधी राज्य सरकारच्या हमीवर कर्जाद्वारे उभारणी करण्यात येत असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे मंत्रिमंडळ उपसमितीला देण्यात आली.
६८३ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मध्ये एकूण ४२८.८९ किलोमीटर, पुणे महानगर प्रदेशात (पीएमआर) १६९.४५ किलोमीटर आणि नागपूर महानगर प्रदेशात (एनएमआर) ८५.२० किलोमीटरचे मेट्रो मार्गांचे जाळे विकसित होत आहे. येत्या वर्षभरामध्ये यातील ८७ किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रमुख प्रस्तावित मेट्रो प्रकल्प
मुंबई मेट्रो-११ (अणिक डेपो–वडाळा–गेटवे ऑफ इंडिया) -१७.५१ कि.मी.
मुंबई मेट्रो-८ ( मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ) -३४.९० कि.मी.
मुंबई मेट्रो-१० (गायमुख–छत्रपती शिवाजी महाराज चौक) -९.२० कि.मी.
मुंबई मेट्रो-१३ (शिवाजी चौक–वसई-विरार) -२५.३ कि.मी.
मुंबई मेट्रो-१२ए (मानपाडा–कल्याण–खुटारी–तळोजा) -१८.४० कि.मी.
मुंबई मेट्रो-३ विस्तार (कफ परेड-नेव्ही नगर)-१.४० कि.मी.
मुंबई मेट्रो-१४ (कांजूर–बदलापूर) -४५.१५ कि.मी.
नवी मुंबई मेट्रो१ए व २ (बेलापूर–सागर संगम व पेंधर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)-१७.९ कि.मी.
पुणे येथील हडपसर–लोणी काळभोर व हडपसर–सासवड रोड-१६.६८ कि.मी.
पुणे मेट्रो फेज-३ (निगडी–वाकड–नाशिक फाटा–चाकण)-४२ कि.मी.
कान्हान नदी–कान्हान सिटी (नागपूर फेज-२ विस्तार) -१.४५ कि.मी.
