मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम गटाच्या परीक्षेला शनिवारपासून सुरुवात होत आहे.

या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची होणारी धावपळ व त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सीईटी कक्षाने महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे, छायाचित्र घेऊन ओळख पडताळली केली जाणार आहे. तसेच वेळेत परीक्षा केंद्रांवर न पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटी ११ ते २० एप्रिल या कालावधीत होणार आहे. राज्यभरातून या परीक्षेसाठी ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी व त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सीईटी कक्षाने महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहण्यासंदर्भात प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिला आहेत.

परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्र घेऊन त्यांची ओळख पडताळणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करा

परीक्षेला निघण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी तीन महत्त्वाची कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करावी. यामध्ये विद्यार्थ्यांचे छायाचित्र व स्वाक्षरी असलेले प्रवेशपत्र सोबत घ्यावे. प्रवेशपत्रावर दिलेल्या यादीमधील एक मूळ आणि वैध ओळखपत्र सोबत घ्यावे. ओळखपत्राची छायाप्रत किंवा सत्यप्रतीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना लेखनिक किंवा अतिरिक्त वेळेची गरज आहे, त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड (मुळ प्रमाणपत्र) पडताळणीसाठी सोबत ठेवावे.

सीईटी परीक्षेचे स्वरूप

ही परीक्षा एकूण १८० मिनिटांची असून ती दोन भागांत विभागली आहे. पहिली ९० मिनिटे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांसाठी असतील. ही ९० मिनिटे पूर्ण झाल्यावर पहिला भाग आपोआप सबमिट होईल. त्यानंतर पुढील ९० मिनिटे गणित विषयासाठी दिली जाणार आहेत.

इंग्रजीमधील प्रश्नपत्रिका अंतिम

सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मराठी, उर्दू भाषेची निवड केली असेल आणि त्यांना परीक्षेतील प्रश्नासंदर्भात काही विसंगती असल्यास प्रश्नपत्रिकेची इंग्रजी आवृत्ती अंतिम राहणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.