मुंबई : राज्यातील शैक्षणिक संस्थांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवरील स्थगिती बुधवारी उठवण्यात आली आहे. शिक्षण संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रांच्या वितरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव या पदाचे अति वरिष्ठvअधिकारी आता सक्षम प्राधिकारी असणार आहेत.
शैक्षणिक संस्थांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने दिली जातात. या प्रमाणपत्राची सेवा लोकसेवा हक्क कायद्यानुसार अधिसूचित केलेली आहे. तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा २८ जानेवारी रोजी शासकीय दुखवटा होता. मात्र या काळात ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्याची प्रमाणपत्रे वितरित झाली होती. ही बाब समोर येताच सरकारवर मोठी टीका झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा केली होती.
अजित पवार यांच्या निधनानंतर अल्पसंख्याक विभाग सुनेत्रा पवार यांच्याकडे आला. त्यानंतर विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच शैक्षणिक संस्थांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आली होती. आता ही स्थगिती उठविण्यात आली आहे. २०१३ च्या शासन निर्णयानुसार अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यासाठी विभागातील सहसचिव आणि उपसचिव सक्षम प्राधिकारी होते.
त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. हे अधिकार आता विभाग प्रमुखाकडे देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळाल्यास शिक्षण संस्थांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा लागू होत नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यामधून संस्थांना सूट मिळते. कर्मचारी नियुक्त करताना अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या संस्थांना आरक्षणातून सूट मिळते.
अनेक लाभ असल्यामुळे राज्यात अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांकडून प्रयत्न होत असतात. यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. २०२१ पर्यंत राज्यात ३,२२१ अल्पसंख्याक शिक्षण संस्था होत्या. या शाळांच्या अल्पसंख्याक दर्जासंदर्भातही विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे सर्व अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्राची सध्या पडताळणी करण्यात येत आहे.
