मुंबई : राज्यात २०२४ – २५ या दोन वर्षांत तब्बल १ कोटी १७ हजार ३६९ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ८६ हजार २२८ मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे. पण, उर्वरीत ३१ हजार १४१ महिला आणि मुली अद्यापही बेपत्ता आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला, मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष कक्षाकडून मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे बेपत्ता महिला सापडण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

निरंजन डावखरे, चित्रा वाघ, भाई जगताप आदींनी बेपत्ता महिला आणि मुलींचा प्रश्न उपस्थित केला होता. गृह (शहर) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रश्नाला उत्तर दिले. पण, सदस्यांचे समाधान झाले नाही. विषयाचे गांभीर्य आणि सदस्यांची आक्रमकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करून उत्तर दिले.

हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने विशेष कक्ष तयार केला आहे. या कक्षात अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. त्या शोध मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम पाहतात. या विशेष कक्षाने केलेल्या कामांमुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विशेष कक्षाच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियमित बैठकांचे आयोजन करून आढावा घेतला जातो. हरवलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यभरात मोहिम हाती घेतल्या जात आहेत. पहिल्या वर्षभरात साधारण ५५ ते ६० टक्के महिलांचा शोध लागतो, तर अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत हा आकडा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. राज्य शासनाचे उद्दिष्टे ९५ ते ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचणे आहे आणि तोपर्यंत शोध सुरूच ठेवला जाईल. हरवलेल्या माहिला, मुलींच्या कुटुंबाकडून एक वर्षभर पाठपुरावा केला जातो. त्यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांचे काहीसे दुर्लक्ष होते. पण, यापुढे शोध घेण्यात सातत्य ठेवले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

बेपत्ता महिला, मुलींची स्थिती

२०२४ मध्ये ४५,६६२ महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ३०,८७७ महिलांचा शोध लागला. १४,७८५ महिलांचा शोध लागला नाही. याच वर्षी ११,३१६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ८,४७५ मुलींचा शोध लागला. उर्वरीत २,८४१ मुली अद्याप बेपत्ता आहेत. २०२५ मध्ये ४८,२७८ महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ३६,५८१ महिलांचा शोध लागला. उर्वरित ११,६९७ महिला अद्याप बेपत्ता आहेत. याच वर्षी १२,११३ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १०,२९५ मुलींचा शोध लागला. उर्वरित १८१८ मुली अद्याप बेपत्ता आहेत. हरविलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहिम राबविण्यात येते, अशी माहितीही डॉ. पंकज भोयर यांनी दिली.