मुंबई : राज्यवासींची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सूनने शनिवारी तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. हवामान विभागाने मान्सूनच्या वाटचालीची माहिती दिली असून राज्यातील मुंबईसह उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळेल. काहीभागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून या दरम्यान सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

यंदा सरासरी वेळेच्या ३ दिवस उशिरा म्हणजेच ४ जून रोजी मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाले. त्यांनतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल वेगाने उत्तरेच्या दिशेने होऊन शुक्रवार, ५ जून रोजी कर्नाटक, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह गोव्यातील काही भागांतही प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यात लवकरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार, मोसमी वाऱ्यांनी शनिवारी संपूर्ण गोवा प्रदेश व्यापला असून राज्यातील तळकोकणात हजेरी लावली आहे.

यंदा तीव्र उष्णतेचा, तसेच विदर्भासह अनेक भागांना तीव्र उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीचा सामान करावा लागला. त्यानंतर वादळी पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत होता. मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष मान्सूनकडे लागले होते. अखेर मान्सूनने राज्यात प्रवेश केला असून पुढील काही दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज आहे. तळकोकणात हजेरी लावल्यानंतर अनेकदा मान्सून वेगाने मुंबईसह उत्तर कोकणात दाखल होतो. सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली. लवकरच मान्सूनचे आगमन मुंबईत होईल, असा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी

२४ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून २५ मे रोजी तळकोकणात दाखल झाला होता. तर मुंबई येथे २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. यावर्षी केरळ येथे ४ जून रोजी दाखल झालेला मान्सूनने २४ तासात गोव्यापर्यंत मजल मारली होती. तर तळकोकणात या दिवशी मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा जून महिन्यात पर्जन्यमान कमी असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे, त्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल याकडे नागरिकांसह बळीराज्याचे लक्ष लागले आहे.