मुंबई : एल – निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता असतानाही राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत ६३७.१ मिमी पाऊस पडला आहे, या काळात सरासरी ६२२.७ मिमी पाऊस पडतो, सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त पाऊस पडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हिंगोली सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाने सरासरी गाठली असली तरीही सर्वच जिल्ह्यात सरासरी गाठलेली नाही.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पडला आहे. तर सरासरी इतका पाऊस मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, सांगली, धाराशीव, लातूर, नांदेड,परभणी, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. या काळात राज्यात सरासरी १०.२ मिमी पाऊस पडतो, यंदा ३.६ मिमी पाऊस पडला आहे. पहिल्या आठवड्यात ६५ टक्के कमी पाऊस पडला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा
वाशिम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जालना, हिंगोली, बीड, सोलापूर, नंदूरबार या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीत सरासरीच्या तुलनेत ३६ टक्के कमी पाऊस झाला आहे. हिंगोलीत या काळात सरासरी ४६२.२ मिमी पाऊस पडतो, यंदा आजवर २९५.५ मिमी पाऊस पडला आहे.
धरणांतील पाणीसाठा ७१ टक्क्यांवर
राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या, अशा एकूण ३०२९ धरणांमध्ये ७१,२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा ३६८३५.६५ दलघमी इतका असून, एकूण पाणी साठवणूक क्षमता ४८५५३.६४ दलघमी इतकी आहे. विभागनिहाय नागपूरमध्ये ५८.९१ टक्के, अमरावतीत ५८.०३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ४८.६९ टक्के, नाशिकमध्ये ७३.५४ टक्के, पुणे विभागात ८४.७८ टक्के, कोकण विभागात ८६.११ टक्के, असा एकूण पाणीसाठा ७१.२३ टक्क्यांवर गेला आहे.
खरीप पेरणी ९० टक्क्यांवर
मोसमी हंगामाच्या सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ९० टक्क्यांवर गेल्या आहेत. खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख ५८ हजार ८६८ हेक्टर आहे. कोकण विभागात ६९ टक्के, नाशिक विभागात ९५ टक्के, पुणे विभागात ९३ टक्के, कोल्हापूर विभागात ९२ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९१ टक्के, लातूर विभागात ९१ टक्के, अमरावती विभागात ९३ टक्के आणि नागपूर विभागात ८२ टक्के, अशी एकूण ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
