मुंबई : राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या सहा विभागीय क्षेत्रांतील धरणांमध्ये मागील आठवडयात पडलेल्या ३२ दशलक्ष घनमीटर पावसाने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. सुमारे तीन हजार धरण क्षेत्रांमध्ये गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्याला मोठा दिलासा मिळाला. आतापर्यंत राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्का पाऊस कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७३ टक्के पाऊस झाला होता, तर यंदा आतापर्यंत ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली तूट जुलै आणि ऑगस्टमधील दमदार पावसाने भरून काढली आहे. राज्यातील धरण क्षेत्रांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक बनली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील धरण क्षेत्रांमध्ये सरासरी ३०.०४ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाची सरासरी गाठण्याच्या दिशेने यंदाचा पाऊस यशस्वी ठरला आहे.
मोठ्या धरणांमध्ये कोयना धरणात (१००.१२ टीएमसी) जायकवाडीमध्ये (७६.६६) पेंच प्रकल्पात (४४.५६), इसापूरमध्ये (३४.६४) गोसीखुर्द (२६.१४), खडकवासला (२५.२५), अप्पर वर्धा (१९.९२), मुळा धरणात (२१.५०) आणि भंडारदरा धरणात (१०.७४) पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवण झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे.
पावसाळ्याचे आणखी दीड महिने शिल्लक असल्याने राज्यातील धरण क्षेत्रांमध्ये आणखी चांगला पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कालावधीत सरासरीच्या ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात धरणांमधील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणाची पाणीसाठा क्षमता वाढली आहे. गेल्या वर्षी पेक्षा या धरणांमध्येही एक टक्का पाणीसाठा कमी आहे.यंदा ९२ टक्के पाणी साठा आहे. ७४.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.
