मुंबई : राज्यात १ जून ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत पावसाची सुमारे १४.७ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. राज्यात या कालावधीत सरासरी ८२४.५ मि.मी. पावसाची अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७०३.४ मिमी. पाऊस झाला. सरासरीच्या ८५.३१ टक्के पाऊस पडला असून, १५ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाअभावी पिके करपू लागली आहे. आठवडाभरात पाऊस न पडल्यास पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

कृषी विभागाने जाहीर केलेल्या जिल्हानिहाय पर्जन्यमान अहवालानुसार राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये पावसाचे चित्र वेगवेगळे आहे. कोकण विभागात सरासरी २,४८२.६ मिमी. पाऊस पडतो, त्या तुलनेत २,४०५.१ मिमी प्रत्यक्ष पाऊस झाला असून, सरासरीच्या ९६.८४ टक्के पाऊस नोंदविला आहे. त्यामुळे कोकणात पावसाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. नाशिक विभागात सरासरी ५५५.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना ४१२.५ मिमी पाऊस झाला. नाशिक विभागात सरासरीच्या ७४.२४ टक्के पाऊस पडला आहे. पुणे विभागात सरासरी ७७३.३ मिमी पाऊस पडतो, त्या तुलनेत ५६८.८ मिमी पाऊस झाला. सरासरीच्या ७३.५३ टक्के पाऊस नोंदविला.

मराठवाड्यात पावसाची मोठी कमतरता

छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाची स्थिती अधिक चिंताजनक आहे. विभागात सरासरी ७९३.९ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात पर्जन्यमान ३८२.९ मिमी झाले असून, सरासरीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सुमारे ७४.५७ टक्के आहे. अमरावती विभागात सरासरी ६१८.९ मिमीच्या तुलनेत ४४९.३ मिमी पाऊस झाला असून, सरासरीच्या ७८.२९ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. नागपूर विभागात सरासरी ८९७.२ मिमीच्या तुलनेत ६५०.९ मिमी पाऊस झाला असून, पर्जन्यमानाची टक्केवारी ७२.५५ टक्के आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी पिके करपू लागले आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्हानिहाय मोठी तफावत

कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ गोंदिया आणि गडचिरोलीत सरासरी इतका पाऊस पडला आहे, तर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरमध्ये झाली आहे. सर्वात कमी ४७.४८ टक्के पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे.