मुंबई : यंदा भारतात हवामान बदलाचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. दीर्घकाळ टिकून राहणारी उष्णेतची लाटेसदृश्य स्थिती, कमाल तापमानात होणारी वाढ, रात्री जाणवणारा असह्य उकाडा यातच आता यंदाचा पावसाचा हंगाम आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. जूनच्या पंधरवड्यात देशात सरासरी पावसाच्या केवळ ३२ टक्केच पावसाची नोंद झाली असून त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच मान्सूनची वाटचाल संथ गतीने होत असून राज्यासह देशात मान्सून सक्रिय होण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
देशात सर्वसाधारणपणे १ ते १५ जून या कालावधीत ६२.१ मिमी पावसाची नोंद होते. यंदा या कालावधीत ४२.४ मिमी पाऊस नोंदला गेला. जो सरासरीहून ३२ टक्के कमी आहे. तर संपूर्ण जून महिन्यात हेच प्रमाण साधारणपणे १५० ते २०० मिमी इतके आहे. देशात केवळ वायव्येकडील प्रदेशात सरासरीहून ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर उर्वरित देशातील बहुतांश प्रदेशात सरासरीहून कमीच पाऊस नोंदला गेला आहे.
यंदा केरळ येथे ४ जून रोजी मान्सून दाखल झाला असून त्याने देशाच्या काही भागात वाटचाल केली. मात्र, अजूनही मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसून काही भागात पावसाचे प्रमाण कमीच आहे, असे नुकताकच भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित झाल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या हंगामांवर ‘एल निनो’ स्थितीचे सावट असणार आहे.
जूनच्या पंधरवड्यात राज्यातील स्थिती काय ?
राज्यातही सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण प्रदेशात जूनच्या पंधरवड्यात सरासरी पावसाचे प्रमाण २७.४ मिमी इतके असते. मात्र, आतापर्यंत केवळ ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे या प्रदेशात सरासरीहून ९८ टक्के कमी पाऊस पडला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात सरासरीहून ९८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे, तर मराठवाड्यात हेच प्रमाण ९४ टक्के आहे. याचबरोबर विदर्भात सरासरी पावसाच्या ७७ टक्के कमी पावसाची नोंद झाली.
राज्यात सध्या काही भागात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झालेला नाही. तसेच काही भागात वादळी पावसाची स्थिती असून काही भागात उष्णेतची तीव्रता अधिक आहे. मान्सूनची वाटचाल होण्यास आणखी काही दिवस लागतील, असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागण्याचा शक्यता आहे.
