मुंबई : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादन वाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याबाबत शासन पातळीवर हालचाली सुरू आहेत. सध्या १ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल, ज्यामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल, असे सूतोवाच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे ‘सिल्व्हर पापलेट’सह समुद्रातील इतर प्रमुख माशांच्या प्रजातींच्या उत्पादनवाढीवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
नितेश राणे यांनी नुकत्याच मंत्रालयात आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला, ज्यामध्ये मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे.
मच्छिमारांमध्ये नाराजी
सध्या मासेमारीसाठी सवलतीच्या दराने मिळणारा डिझेल महाग झाला आहे. डिझेल दर लिटर मागे १४० रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे मच्छिमारांना नियमित डिझेल कोटाही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर बंदी नंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याने मासळीला योग्य दर मिळत नाही. मासेमारी व्यवसाय घाट्यात चाललेला असतांना मासेमारीच्या ऐन हंगामात बंदीत वाढ केल्याने मच्छिमारांवर अधिकच संकट येणार असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील बदलणारे हवामान, वाढती चक्रीवादळे आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे १ ऑगस्टनंतरही मच्छीमारांना समुद्रात जाणे अनेकदा शक्य होत नाही. दुसरीकडे, जगभरातील अनेक प्रमुख सागरी देश तसेच शेजारील गुजरात राज्याने निसर्ग संवर्धन आणि मत्स्य उत्पादनवाढीसाठी ७६ दिवसांची बंदी यशस्वीरीत्या लागू केली आहे. असा दावा सरकार कडून करण्यात आला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही मासेमारी बंदीचा कालावधी ७६ दिवस म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट असा करण्याबाबत आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
पावसाळी मासेमारी बंदी मच्छिमार सरकार
पावसाळ्यात केली जाणारी मासेमारी बंदी ही माश्यांच्या प्रजननासाठी काळ म्हणून केली जाते. असा सरकारचा दावा आहे. हे जरी खर असलं तरी याच कालावधीत इतर राज्यातील मासेमारी बोटी राज्याच्या हद्दीत सर्वात अधिक मासेमारी करतात याचा फटका बंदी काळा नंतर राज्यातील मासेमारी व्यवसायावर होते असे उरणच्या करंजा परिसरातील मच्छिमारांचे म्हणणे आहे.तर ऑगस्ट नंतर समुद्रातील माशांची संख्या कमी होत असल्याचाही दावा मच्छिमारांकडून केला जात आहे.
