मुंबई : राज्यात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेल्याने बहुतांश भागांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने जूनअखेरीस दीर्घकालीन अंदाजात राज्यात विदर्भ वगळून इतरत्र सरासरीहून कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीहून ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुष्काळाचे सावट असलेल्या बहुतांश प्रदेशांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात यंदा मोसमी पाऊस विलंबाने दाखल झाला. मात्र, हंगामाच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचे प्रमाण असमान होते. तसेच सर्वदूर पावसाचाही अभाव होता. त्यामुळे जून अखेरीस राज्यातील बहुतांश भागात सरासरीहून कमी पाऊस नोंदला गेला. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात मोमसी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे राज्यात चांगल्या पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांत जूनच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली. त्यामुळे या प्रदेशात असणारी पावसाची तूट काहीशी भरून निघाली. राज्यात आतापर्यंत मोसमी पावसाच्या हंगामात ६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तसेच कोकण प्रदेशात २ टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात २० टक्के अधिक, तर मराठवाड्यात ८ टक्के आणि विदर्भात १ टक्का कमी पाऊस नोंदला गेला. तसेच नंदुरबार, सोलापूर, सिंधुदुर्ग, बीड आणि हिंगोली आदी भागात पावसाची तूट २० टक्क्यांहून अधिक आहे.

‘एल निनो’ स्थिती तीव्र होण्याचा अंदाज

नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामादरम्यान प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थिती अधिक तीव्र होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीहून जास्त आहे, अशी माहिती हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. तसेच हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयोडी) तटस्थ स्थितीत असून मोसमी पावसाच्या हंगामात ही तटस्थ स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रांच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये ही सकारात्मक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

आज पावसाची शक्यता कुठे ?

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात रविवारी वादळी पावसाचा अंदाज असून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील पावसाचे प्रमाण कमी असेल असा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवसांत राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.