मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, २ ते ७ जुलै या कालावधीत राज्यातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे काही भागात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला बळ देणाऱ्या काही हवामान प्रणाली सक्रिय झाल्या असून त्यामुळे राज्यात पावसाचा जोर अधिक आहे, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

राज्यात जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली असून त्यामुळे अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद होत आहे. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून, तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर एक ऑफ-शोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाची एक लांब पट्टी सक्रिय असून ती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरताही ३ जुलैच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, १ जूनपासून आतापर्यंत राज्यात सरासरी पावसाहून ४१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, २ ते ७ जुलै या कालावधीत कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यासोबतच २ ते ४ जुलैदरम्यान विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज मुसळधार पावसाचे इशारे कुठे ?

पालघर आणि पुणे घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून आज ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे, तर कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, रायगड, मुंबई, ठाणे, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, बुलढाणा आणि आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

तसेच सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, नाशिक घाट विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.