मुंबई : मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्य्यात राज्यात सरासरी इतका पाऊस झाला असला तरीही बहुतांश भागात तूट कायम आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची २० ते ४० टक्क्यांपर्यंत सर्वाधिक तूट नोंदवली गेली आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील ”एल निनो” स्थिती ऑगस्टमध्ये मध्यम तर सप्टेंबर महिन्यात मध्यम ते तीव्र स्थितीत राहील, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे. पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

राज्यात जूनमधील पावसाची ओढ जुलैतील मुसळधार पावसामुळे भरून निघाली होती; मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर ओसरल्याने अनेक भागांत ही तूट निर्माण झाली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील बहुतांश भागात सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरातील एल निनोची

स्थिती ऑगस्टमध्ये मध्यम तर सप्टेंबर महिन्यात मध्यम ते तीव्र स्थितीत राहील. पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ऑगस्टच्या उत्तरार्धात बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास काही भगत चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला.

विभाग

कोकण विभाग – सरासरीहून ४ टक्के कमी मध्य महाराष्ट्र – सरासरीहून २१ टक्के अधिक मराठवाडा – सरासरीहून १६ टक्के कमी विदर्भ – सरासरीहून १६ टक्के कमी

राज्यात सर्वाधिक तूट कुठे ?

नंदुरबार, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, लातूर, जालना, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागात सरासरीहून सर्वाधिक ( २० ते ३९ टक्के ) या दरम्यान तूट कायम आहे. या भागात हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रणाम कमी आहे. दरम्यान, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची नोंद झाल्याने या भागातील पावसाची तूट काहीशी भरून निघाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात

नाशिक जिल्ह्यात १ जून ते १५ ऑगस्ट या दरम्यान ६०६.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा या कालावधीत तेथे १ हजार ३९ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरी पावसाच्या ७१ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच पालघर जिल्ह्यात ३९ टक्के अधिक, मुंबई (सांताक्रूझ) २५ टक्के, पुणे जिल्हा ४५ टक्के, सातारा ३८ टक्के तर छत्रपती संभाजीनगर येथे सरासरी पावसाहून २० टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली आहे.