मुंबई: मोसमी पावसाच्या दुसऱ्या हंगामातील उत्तरार्धातही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश असून मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच या भागात पावसाची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडले असून सप्टेंबर महिन्यात दिलासादायक पाऊस होईल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव मोसमी पावसाच्या हंगामावर आहे. ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता पुढील काही महिन्यात वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे. संपूर्ण देशात १४ टक्के इतकी पावसाची तूट आहे, तर राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाहून ११ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश, तर मध्य महाष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची तूट असून ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने या प्रदेशातील तूट वाढली आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत या हंगामात (१ जून ते ३१ ऑगस्ट) राज्यातील १९ जिल्ह्यांत २० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आहे, तर ८ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी तूट आहे. मात्र, मोसमी पावसाचा उर्वरित हंगाम खडतर असू शकतो, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.
सप्टेंबरमध्ये तरी दिलासा मिळणार का ?
राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रदेशात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील बहुतांश भागांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोकण प्रदेशातील काही भागातही पावसाचा अंदाज आहे मात्र, या दरम्यान सर्वदूर पावसाचा अभाव राहिल्यास पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता फारच कमी असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळेल, असेही अभ्यासकांची सांगितले.
सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे
| जिल्हा | टक्केवारी (१ जून ते ३१ ऑगस्ट) |
|---|---|
| सोलापूर | ४७% |
| हिंगोली | ४६% |
| बीड | ४५% |
| अमरावती | ४१% |
| नंदुरबार | ३९% |
| जालना | ३९% |
| अकोला | ३८% |
| नागपूर | ३६% |
| सिंधुदुर्ग | ३४% |
| परभणी | ३४% |
| चंद्रपूर | ३४% |
| धाराशिव | ३२% |
| अहिल्यानगर | ३१% |
| वाशीम | ३१% |
| नांदेड | २९% |
| वर्धा | २९% |
| लातूर | २७% |
| गडचिरोली | २१% |
| यवतमाळ | २०% |
| भंडारा | १६% |
| सांगली | १४% |
| रत्नागिरी | १३% |
| बुलढाणा | १३% |
| धुळे | १०% |
| कोल्हापूर | ७% |
| जळगाव | ५% |
| ठाणे | ५% |
सरासरीइतका पाऊस
छत्रपती संभाजीनगर, रायगड, मुंबई शहर (कुलाबा)
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
नाशिक (५४), सातारा (३३), पुणे (३१), पालघर (२७), मुंबई उपनगर – सांताक्रुझ (१४)
