पावसाळ्याच्या चार महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकऱ्यांनी पिके जगवली पण अखेरच्या टप्प्यात परतीचा पाऊस न झाल्यामुळे अपेक्षित उत्पादन होणार नाही. कोकण किनारपट्टीवरील भात नागली पिकाला अखेरच्या टप्प्यात पावसाची गरज होती ती तिथेही परतीचा पाऊस न झाल्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. विदर्भाची अवस्था या हून वेगळी नाही. मराठवाड्याची अत्यंत भयानक होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागातील पूर्व भागाची होरपळ

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या अनियमिततेचा, अपुऱ्या पावसाचा गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः पूर्व भागातील संपूर्ण सोलापूर, सांगली , सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग आणि अहिल्यानगरच्या लगतच्या भागात सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि बाजरी ही पिके पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. बहुतेक पिके करपून गेली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असून, सुमारे ४ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ हे चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत, तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील पिकांची अत्यंत गंभीर आहे.

सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप पिकांवर ताण आहे. पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भाग हा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश असल्यामुळे एकूणच, पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा आणि परतीचा पाऊस निर्णायक ठरणार होता. पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुणे विभागातील पूर्व भागातील पिकांची होरपळ सुरू आहे.

मराठवाड्यात ऐन दिवाळीत पाणीबाणी टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव हे आठ जिल्हे येतात. यंदाच्या खरीप हंगामात या विभागाला पावसाच्या मोठ्या खंडाचा फटका बसला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत विभागात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या केवळ ६५.५ टक्के पाऊस झाला असून सुमारे ३४.५ टक्के तूट आहे.

सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग आणि उडिद या खरीप पिकांवर झाला आहे. एकूणच, विभागातील कोरडवाहू शेती सर्वाधिक अडचणीत असून अनेक भागांत उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक असून, सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे

परतीच्या पावसाअभावी तूर, कापूस अडचणीत

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा परिणाम झाला आहे. विभागातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, तूर आणि मका असून, विशेषतः सोयाबीन व कापूस पिके अडचणीत आली आहेत. राज्यभर सुरुवातीला पेरणी चांगली झाली असली तरी ऑगस्टमधील पावसाच्या मोठ्या खंडामुळे फुलोरा, शेंगा आणि बोंड भरण्याच्या अवस्थेतील पिकांना फटका बसला.

अमरावती जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असून सुमारे ४० दिवसांच्या कोरड्या कालखंडामुळे सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची तूट नोंदली गेली असून ६९ महसूल मंडळांमध्ये पीक-पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. कृषी विभागाने उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकूणच, अमरावती विभागातील कोरडवाहू खरीप शेती संकटात आहे. परतीच्या पावसावर भिस्त होती. पण परतीचा पाऊस न पडल्यामुळे तूर आणि कापूस या उशिराने काढणीला येणारी पिकेही अडचणीत आली आहेत.

पूर्व विदर्भातील जास्त पावसाचा पट्टाही अडचणीत

नागपूर विभागातील पिकांची स्थिती

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या मोठ्या तुटीचा परिणाम झाला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विदर्भात सरासरीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी पाऊस झाला. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत सुमारे ३४ टक्के, तर चंद्रपूरमध्ये ३३ टक्के पावसाची तूट नोंदली गेली.

विभागातील प्रमुख पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि धान यांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत नागपूर विभागात काही पिकांना निर्णायक अवस्थेत झालेल्या पावसाचा फायदा झाला आहे.

नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये पावसाची तूट गंभीर असून सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील भात पट्ट्यालाही दुष्काळाचा मोठा फटका बसला असून, उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

किनारपट्टीवर भाताची वाढ खुंटली, नाचणी सारख्या अन्य पिकांनाही फटका

कोकण विभागात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेचा आणि दीर्घ खंडाचा पिकांवर परिणाम झाला आहे. भात हे प्रमुख खरीप पीक असून, अनेक भागांत भात दाणा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी भाताची वाढ खुंटणे, फुटव्यांची संख्या कमी होणे आणि दाणे पूर्ण न भरण्याच्या तक्रारी आहेत. नाचणी, वरई आणि कडधान्यांनाही पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत परिस्थिती अधिक चिंताजनक असून भात व नाचणी पिकांवर पाण्याच्या कमतरतेचा परिणाम दिसत आहे. आंबा, काजू आणि नारळ या बागायती पिकांवरही अनियमित पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रायगडमधील काही भागांतही पिकांना ताण जाणवत आहे.

दुसरीकडे, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील परिस्थिती तुलनेने समाधानकारक असली तरी भाताच्या दाणा भरण्यासाठी परतीच्या पावसाची गरज होती. परतीचा पाऊस न झाल्यामुळे सर्व पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

dattatray.jadhav@expressindia.com