मुंबई : राज्यात सध्या काही भागात मुसळधार, तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, राज्यावरील वादळी पावसाचा प्रभाव वाढत असून पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत बहुतांश राज्यात पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे तर काही भागात पावसाची तूट कायम आहे. हवामान विभागाने आज काही भागांना ‘ऑरेंज’, तर काही भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
वायव्य बंगालच्या उपसागरावर, तसेच उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. तसेच पश्चिम राजस्थानावर एक चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे देशाच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांवर वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत असून महाराष्ट्र्रतही कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात वादळी वारे वाहत असून मागील काही दिवसांच्या तुलनेत काही प्रदेशात वाऱ्यांची तीव्रता अधिक असल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणांवरून निदर्शनास आले आहे.
मागील चोवीस तासात राज्यातील कोकण प्रदेशातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे वादळी पावसाची नोंद झाली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक घाट प्रदेशात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.
आज ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे ?
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा घाट विभाग आणि पुणे घाट विभाग आदी भागांना सोमवारी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, नागपूर, बुलढाणा, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव, बीड आणि परभणी आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.
