मुंबई : राज्यातील काही भागात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यात पावसाचे सरासरी आकडे गाठल्याचे दिसत असले तरीही जवळपास अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. जुलै महिन्याचे आठ दिवस सरले तरीही अनेक भागांत पावसाने हजेरीही लावलेली नाही. मध्य महाराष्ट्र, मराठवाडयातील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात आतपर्यंत सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. या प्रदेशात पावसाची तूट भरून निघाली नाही तर येणाऱ्या काही काळात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असताना निम्मा महाराष्ट्र अद्यापही दुष्काळाच्या सावटाखाली आहे. यंदा मोसमी पावसाचे राज्यातील वितरण असमान आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यत २७५ टक्के पावसाची नोंद झाली असून तो सरासरीहून १ टक्क्यांनी कमी आहे. जून महिन्याच्या अखेरीस हेच प्रमाण ४७ टक्के इतके होते. काही भागात मोसमी वाऱ्यांची वाटचाल होऊनही वाऱ्यांचा आणि इतर आवश्यक प्रणालींचा अभाव असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक भागात सरासरी पावसाहून कमी पाऊस नोंदला गेला होता. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस राज्यातील काही भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला तसेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाला बळ देणाऱ्या काही हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने अनेक भागात या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागात सरासरी इतका तर काही भागात सरासरीहून अधिक पावसाची नोंद होऊन शेतीच्या कामांना सुरुवात झाली. मात्र, राज्यात एकीकडे दिलासादायक

चित्र असतानाच दुसरीकडे अनेक जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तळकोकणात ६ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. मात्र, सुरुवातीचे काही अपवाद वगळता येथेही पावसाने विश्रांती घेतली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यत सरासरी पावसाच्या २२ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. उर्वरित राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस नोंदला गेला आहे तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा आदी भागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस नोंदला गेला नाही.

दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता वाढत असल्याने यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामावर त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवली आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. भारताच्या मोसमी पावसाच्या हंगामात जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद होत असल्याने हा महिना नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि देशाच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो.

मराठवाडा विभागात सर्वाधिक तूट

राज्यात १ जून ते ७ जुलै दरम्यान नोंदल्या गेलेल्या पावसाच्या आधारे आतापर्यत कोकण आणि गोवा प्रदेशात ११०५ मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरी पावसाहून १७ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात आतापर्यत २०९ मिमी पाऊसाची नोंद झाली असून तो सरासरी पावसाहून २ टक्क्यांनी अधिक नोंदला गेला. मात्र, यात घाट विभागात अधिक पाऊस झाला असून अंतर्गत भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मराठवाडा विभागात ११८.४ मिमी पाऊस झाला जो सरासरी पावसाहून २९ टक्क्यांनी कमी आहे. येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ३० ते ३५ टक्के पावसाची तूट असून यात सर्वाधिक हिंगोली येथे ५३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथे सरासरीहुन १७ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. तसेच विदर्भात सरासरी पावसाहून १४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

नंदुरबार येथे सर्वात कमी पाऊस

उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार येथे आतापर्यत २२५.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, आतापर्यत येथे केवळ ६६.२ मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरी पावसाहून ७१ टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ८:३० ते बुधवारी सकाळी ८:३० दरम्यान तेथे १८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून गुरुवारी नंदुरबार येथे हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

आज बहुतांश भागात ‘यलो अलर्ट’

दरम्यान, बुधवारपासून कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील मुसळधार पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला होता. मध्य महाराष्ट्रातील सातारा घाट विभाग आणि पुणे घाट विभागात गुरुवारी हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना ‘यलो अलर्ट’ दिला असून छत्रपती संभाजीनगर आणि जालना आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच उर्वरित राज्यात पावसासाठी कोणतेही इशारे देण्यात आले नाहीत.