मुंबई : देशभरासह राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय होत असून नागरिकांना मोसमी पावसाचे वेध लागले आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, केरळ येथे गुरुवार, ४ जून रोजी नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याचा अंदाज आहे. केरळ येथे गुरुवारी मोसमी वारे दाखल झाल्यास आणि हवामान स्थिती अनुकूल राहिल्यास पुढील काही दिवसात राज्याच्या दक्षिण किनारपट्टिवर नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना लवकरच काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाला यंदा मोसमी वारे हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे केरळ येथे २६ मे रोजी दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर २९ मे रोजी आठवडाभरात मोसमी वारे केरळ येथे दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, मोसमी वाऱ्यांची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू असून वारे केरळ येथे दाखल होण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ४ जूनच्या आसपास नैऋत्य मोसमी वाऱ्यांची नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्रातील काही भाग, लक्ष्यद्वीप समूह, केरळ आणि तामिळनाडूमधील काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात वाटचाल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. यामुळे पुढील काही दिवसात या सर्व प्रदेशात मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत सध्या वादळी पावसाची स्थिती आहे. तसेच कमाल तापमानात मागील काही दिवसांच्या तुलनेत काहीशी घट होताना दिसत असली तरीही उकाडा कायम आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाची तीव्रता अधिक असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर मराठवाड्यातील काही भागात पावसासह गारपिटीची नोंद होत आहे.
दरम्यान, मंगळवारी पुणे, नाशिक तसेच विदर्भातील काही भागात पूर्व मोसमी पावसाची नोंद झाली. तसेच राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच कोकण पट्ट्यातील काही भागात बुधवारीही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आदी प्रदेशातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण प्रदेशात उष्णता कायम
मागील काही दिवसांपासून कोकण प्रदेशात उन्हाची काहिली अधिक जाणवत आहे. तसेच उष्ण आणि दमट वातावरणही कायम आहे. दरम्यान, मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे मंगळवारीही उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. त्यामुळे कोकणवासीयांच्या समस्येत वाढ झाली आहे. घामाने आणि दुपारी जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान, मंगळवारी अलिबाग येथे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर रत्नागिरी येथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. दरम्यान, दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बुधवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
उत्तर कोकणातील मुंबईसह पालघर, ठाणे येथेही उन्हाचा तडाखा अधिक असून या संपूर्ण प्रदेशात सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. डहाणू येथे मंगळवारी ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. जे सरासरी कमाल तापमानाहून ३ अंशांनी अधिक होते. तर ठाण्यातही तापमानाचा पारा ३५ अंशांवर नोंदला जात आहे. उत्तर कोकण प्रदेशातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे बुधवारीही उष्ण आणि दमट वातावरण राहील तसेच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत कोकण प्रदेशातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईकरांना तीव्र उन्हापासून दिलासा नाहीच
मुंबईत मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा स्थिर असला तरीही उकाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सकाळच्या वेळी शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी वळवाच्या सरींची नोंद होत असली तरीही दुपारी नागरिकांना उन्हाची तीव्रता सहन करावी लागत आहे. तर रात्रीच्या वेळीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शहरात सोमवारी आणि मंगळवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, शहरात मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शहरात बुधवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
