मुंबई : राज्यात मान्सूनची आगेकूच सुरु असून सोमवारी मान्सूनने राज्यातील आणखीन काही भागात वाटचाल आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत असून पुढील २ ते ३ दिवसात राज्यातील आणखीन काही भागात मान्सूनची वाटचाल होण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
केरळ येथे यंदा ४ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगाने सुरु असून शनिवारी मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापून तळकोकणात प्रवेश केला होता. दरम्यान, रविवारीही देशात मान्सूनने ईशान्यकडील राज्यासह आणखीन काही भागात वाटचाल केली होती. तसेच सोमवारी मान्सूनने अरबी समुद्रातील आणखीन काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील काही भागात वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
राज्यात वाटचाल कुठे?
मान्सूनने शनिवारी देवगडपर्यंत वाटचाल केली होती. तसेच रविवारी काही भागात प्रवेश करून सोमवारी दक्षिण कोकणातील काही भागात वाटचाल केली आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या काही भागापर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंदीयाल आणि चेन्नई येथून जात आहे. दरम्यान, राज्यात सोमवारी आणि मंगळवारीही बहुतांश भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रात्रीही तलखी
राज्यात सध्या अनेक भागात कमाल तापमानात चढ उतार होत असली तरीही उकाडा कायम आहे. काही भागात किमान तापमानातही वाढ नोंदली जात असून नागरिकांना रात्रीच्या वेळेही उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, १५ जूनपूर्वी राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह काही भागात वादळी पावसाची नोंद होत असून येथील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. पुढील २ ते ३ दिवसात दक्षिण महाराष्ट्रातील कमाल तापामानात १ ते २ अंशांनी घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज, उद्या पावसाची शक्यता कुठे
सोमवारी आणि मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर उत्तर कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम असून त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
