मुंबई : केरळ येथे मागच्या आठवड्यात दाखल झालेला मान्सून शनिवारी तळकोकणात दाखल झाला. त्यामुळे लवकरच राज्यातील इतर भागातही मान्सूनची वाटचाल होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या राज्यात कमाल तापमानात चढ उतार होत असून बहुतांश भागात वादळी पावसाची स्थिती आहे. तर काही भागात हलक्या सरींचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून सोमवारी बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मान्सूनची वाटचाल कुठे पर्यंत ?

मोसमी पावसाची वाटचाल सुरु असून हळूहळू मोसमी पाऊस देशाच्या काही भागात दाखल होत आहे. दरम्यान, रविवारी मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात तसेच त्रिपुरा, मेघालय येथील काही भाग, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागांसह मिझोराम, मणिपूर आणि नागालँड येथील संपूर्ण भाग व्यापून वाटचाल केली, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुढील ३ ते ४ दिवसात उर्वरित अरबी समुद्रासह महाराष्ट्राच्या काही भागात मोसमी पाऊस पुढे सरकरण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात पावसाचा जोर कुठे ?

सध्या सिंधूदुर्ग येथील दोडामार्ग, कणकवली, मालवण आणि कुडाळसह दक्षिण कोकणातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी पावसाची स्थिती असून काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी गारपिटीची नोंद होत आहे.

पुढील चार दिवसात राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील तुरळक भाग वगळून इतर भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज आहे.

आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ कुठे ?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मुंबई. ठाणे, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग आदी भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.